जाहिरात

Vande Metro Mumbai Local : मुंबई लोकलच्या इतिहासातील सर्वात मोठा टप्पा? उपनगरीय प्रवासाचा चेहरा-मोहरा बदलणार!

गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील लोकल सेवेवरील ताण वाढत आहे. दरम्यान मुंबईच्या लोकलला वंदे मेट्रोची साथ लाभणार आहे.

Vande Metro Mumbai Local : मुंबई लोकलच्या इतिहासातील सर्वात मोठा टप्पा? उपनगरीय प्रवासाचा चेहरा-मोहरा बदलणार!

Mumbai suburban travel : गेल्या १०० वर्षात मुंबई लोकलमध्ये मोठे बदल झाले. मुंबईभरात लोकलचं जाळं तयार झाल्यामुळे पर्यटकांना एकाच दिवसात १०० किलोमीटरहून अधिक (ये-जा) प्रवास करता येतो. गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील लोकल सेवेवरील ताण वाढत आहे. दरम्यान मुंबईच्या लोकलला वंदे मेट्रोची साथ लाभणार आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात मुंबई लोकलचं बदललेलं रुप पाहता येणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ (MRVC) मुंबईच्या उपनगरीय नेटवर्कसाठी २,८५६ वंदे मेट्रो डब्यांची खरेदी करणार आहे. यामुळे मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास अधिक आधुनिक, वेगवान आणि सुरक्षित होणार आहे.

कशी असेल वंदे मेट्रोल लोकल सेवा?

मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP) टप्पा ३ आणि ३-A अंतर्गत एकूण २३८ वंदे मेट्रो एसी लोकल गाड्या घेतल्या जातील. प्रत्येक गाडी १२ डब्यांची असेल. या गाड्यांमध्ये 'वॉक-थ्रू' डिझाइन असेल, ज्यामुळे प्रवासी एका डब्यातून दुसऱ्या डब्यात सहज जाऊ शकतील आणि गर्दीचे विभाजन होईल. तसेच आरामदायी कुशन सीट्स, दिव्यांगांसाठी विशेष जागा आणि मोठ्या खिडक्या असतील.

नक्की वाचा - गोरेगाव-सीएसएमटी सेवा 3 महिने बंद राहणार, मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे होणार 'मेगा'हाल

वंदे मेट्रो लोकल कधीपर्यंत धावणार?

कंत्राट दिल्यानंतर अडीच वर्षांत पहिली 'प्रोटोटाइप' गाडी येण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर यशस्वी चाचण्या झाल्यावर पुढील ४ ते ६ वर्षांत सर्व गाड्यांचा पुरवठा केला जाईल. या लोकल गाड्यांना स्वयंचलित दरवाजे असतील, ज्यामुळे फूटबोर्डवरून होणारा प्रवास थांबेल. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे, धूर आणि आग शोधणारी यंत्रणा आणि आपत्कालीन टॉक-बॅक सिस्टम असेल. मुंबईच्या हवामानाचा विचार करून लोकल सेवा या वॉटरप्रूफ आणि गंज-रोधक बनवल्या जातील. या गाड्यांचा ताशी वेग १३० किमीपर्यंत असू शकतो. यामध्ये प्रवाशांसाठी यूएसबी चार्जिंग पोर्ट, वाय-फाय आणि डिजिटल रूट मॅप यांसारख्या आधुनिक सुविधा असतील. 'मेक इन इंडिया' मोहिमेचा भाग असलेल्या या वंदे मेट्रो गाड्यांमुळे मुंबईतील लोकल प्रवासाचा दर्जा उंचावणार असून प्रवाशांना जागतिक दर्जाचा अनुभव मिळेल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com