विशाल पाटील, मुंबई: बीडच्या मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आणि सोमनाथ सुर्यवंशी मृत्यु प्रकरणी न्याय मिळावा यासाठी मुंबईमध्ये जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुखसह सकल मराठा मोर्चाने या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी झालेल्या भाषणादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेबाबत एक सर्वात मोठे विधान केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
अक्षय शिंदेला हालहाल करुन मारण्यात आले. त्याला ज्या अंतरावरुन गोळी मारली ते भयंकर आहे. खरं म्हणजे अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही. ज्यांनी बलात्कार केला त्यांना वाचवण्यासाठी त्याला संपवण्यात आलं, असा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आव्हाड यांच्या या दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळात नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
'शासकीय यंत्रणेत जेव्हा हस्तक्षेप होतात तेव्हा पोलीस बदनाम होतात. अक्षय शिंदेला मारला, निर्घृणपणे हत्या केली. त्याच्या हातात बेड्या होत्या, तो कसा हल्ला करणार? रिव्हॉलव्हरवर त्याच्या हाताचे ठसेच नाहीत. अरे अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही. त्यांनी केला त्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेंला मारला. मात्र लोक बोलायला तयार नाहीत. बलात्काराची केस आहे समाज अंगावर येईल अशी त्यांना भिती वाटते,' असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहतो. धनंजय मुंडे यांचा राजीनामा ही पहिल्यापासून मागणी आहे. ही मराठा वंजारा अशी लढाई नाही, ही माणुसकीची लढाई आहे. मी सुद्धा वंजारी आहे, अभिमानाने सांगतो. मात्र वाल्मिक कराडसारख्या प्रवृतींविरोधात एकत्रपणे लढलं पाहिजे, असंही जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world