मुंबई: मालमत्ताकर थकविणा-या मोठ्या थकबाकीदारांविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेने जप्ती, लिलाव कारवाईचा धडाका सुरू केला आहे. या अंतर्गत महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याने 'डीबीएस रिऍलिटी कंपनी' च्या चांदिवली येथील एकूण 18 मालमत्तांवर टाच आणली आहे. या थकबाकीदार आस्थापनेकडे एकूण 178 कोटी 64 लाख रूपयांची थकबाकी आहे. थकबाकीदार कंपनीने विहित 21 दिवसात करभरणा न केल्यास मालमत्ता लिलावाची कार्यवाही केली जाईल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महानगरपालिका प्रशासनाने सातत्याने आवाहन करुन आणि पाठपुरावा केल्यानंतरही मालमत्ता कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱया मालमत्ताधारकांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जप्ती आणि अटकावणीची कठोर कारवाई करण्यात येत आहे. या मालमत्तांमध्ये भूखंड आणि निवासी - व्यावसायिक इमारती, व्यावसायिक गाळे, औद्योगिक गाळे आदींचा समावेश आहे.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या निर्देशांनुसार आणि सहआयुक्त (कर निर्धारण व संकलन) श्री. विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांकडून करसंकलन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्व संबंधितांनी दिलेल्या मुदतीत करभरणा करावा आणि दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून वेळोवेळी केले जात आहे. तथापि, कर भरणा करण्यास टाळाटाळ करणा-यांवर कठोर कारवाई करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.
महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने सन 2024-25 या आर्थिक वर्षात 6 हजार 200 कोटी रूपये कर संकलन उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्या दृष्टीने विविध पातळ्यांवर कार्यवाही सुरू आहे. दिनांक 26 मे 2024 ते 12 फेब्रुवारी 2025 या कालावधीत 4 हजार 823 कोटी रूपयांचे कर संकलन झाले आहे. म्हणजेच दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत उर्वरित 1 हजार 377 कोटी रूपयांचे कर संकलन करावे लागणार आहे. कर भरणा करण्यास टाळाटाळ करणा-या तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ताकर न भरणा-या मोठ्या थकबाकीदारांना बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कलम 203 अन्वये जप्तीची नोटीस बजावण्यात येत आहेत. विहीत मुदतीत कर भरणा न केल्यास मुंबई महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधित मालमत्तेवर कलम 203, 204, 205, 206 अन्वये प्रथमतः मालमत्तेतील चीज वस्तू जप्त करुन लिलाव केला जाणार आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या याचिका क्रमांक 2592 / 2013 च्या अंतरिम आदेशान्वये जर संबंधित मालमत्तेकडून येणे अपेक्षित कर वसूल न झाल्यास मालमलेचा लिलाव करण्यात येईल, असे नोटीसीद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर मालमत्ताकर थकविणा-या मोठ्या थकबाकीदारांविरोधात जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात येत आहे. या अंतर्गत करनिर्धारण व संकलन खात्याने संघर्षनगर – चांदिवली येथील 'डीबीएस रिऍलिटी कंपनी' च्या एकूण 18 मालमत्तांवर टाच आणली आहे. या थकबाकीदार आस्थापनेकडे भूखंड करनिर्धारणापोटी एकूण 178 कोटी 64 लाख रूपयांची थकबाकी प्रलंबित आहे. वारंवार पाठपुरावा करून देखील प्रतिसाद न मिळाल्याने संपूर्ण 18 मालमत्तांवर जप्तीची नोटीस चिकटविण्यात आली आहे.
(नक्की वाचा- Rinku Rajguru: रिंकू होणार कोल्हापूरची सून? भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलासोबतच्या Photo ने चर्चा)