Mumbai News: उलवेतील गव्हाण गावात मुंबईच्या राडारोड्याचे डोंगर; नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका

काही रहिवाशांनी या प्रकाराबाबत वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी कोणतीही ठोस कारवाई अद्याप झालेली नाही.

जाहिरात
Read Time: 3 mins

मुंबई:  मुंबई शहरात चालणाऱ्या मोठमोठ्या विकासकामांमधून निघणारा राडारोडा (Debris) अटल सेतू मार्गे थेट नवी मुंबईच्या उलवे परिसरात आणला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेषतः गव्हाण गावातील मोकळ्या जागांमध्ये हे डेब्रिज टाकले जात असून, त्यामुळे त्या भागात एक भलामोठा कृत्रिम डोंगर तयार झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, हा डोंगर फक्त राडारोड्याचा नाही, तर सिडकोच्या उदासीनतेचा आणि डेब्रिज माफियांच्या मुजोरीचा देखील पुरावा आहे.

(नक्की वाचा- चांदीवलीतील MMRDAच्या पीएपी इमारतींबाबत मोठा निर्णय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश)

डेब्रिज माफियांना सिडको अधिकाऱ्यांचे अप्रत्यक्ष संरक्षण?

सामान्यपणे अशा प्रकारच्या अनधिकृत डंपिंगवर तातडीने कठोर कारवाई होणे अपेक्षित असते. मात्र सिडकोच्या अधिकाऱ्यांनी केवळ कागदावरच कारवाई केल्याचे चित्र समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी सिडकोकडून एक ‘दाखवायची' कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही डेब्रिजचे डोंगर अधिकच वाढले आहेत, हे पाहून उलवेकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Advertisement

आरोग्याला गंभीर धोका, पर्यावरणाचे मोठे नुकसान

डेब्रिजच्या ढिगाऱ्यांमुळे परिसरातील धूळ वारंवार हवेत उडते आहे, ज्यामुळे श्वसनविकार, दम्याचे त्रास आणि त्वचेच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. याशिवाय पावसाळ्यात या ढिगाऱ्यांमुळे पाणी तुंबण्याची व डेंग्यू-मलेरिया सारख्या आजारांचा फैलाव होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे स्थानिक रहिवासी अनुराधा पाटील म्हणाल्या, “आम्हाला आमच्या मुलांना घेऊन उघड्या मैदानात जाता येत नाही. सगळी कडे धूळधूळ. सकाळी सकाळी मोठमोठ्या ट्रकचा आवाज आणि धूर यामुळे शांतता हरवली आहे.”

(नक्की वाचा-  ठाकरे गटाची BMC निवडणुकीसाठी तयारी, 12 उपनेत्यांवर विशेष जबाबदारी)

कोण करतो डेब्रिजचा डंपिंग?

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील बांधकाम कंपन्यांनी काही ट्रान्सपोर्ट ठेकेदारांमार्फत हा राडारोडा उलव्यात डंप करण्याची 'सेटिंग' केली आहे. यामध्ये काही स्थानिक राजकीय मंडळींचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा संशय नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. काही रहिवाशांनी या प्रकाराबाबत वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी कोणतीही ठोस कारवाई अद्याप झालेली नाही.

स्थानिकांचे आंदोलन छेडण्याचा इशारा

परिसरातील नागरिकांनी याबाबत सिडको, महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र प्रशासनाची कोणतीही ठोस भूमिका समोर येत नसल्याने आता नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. उलवे गावच्या युवा प्रतिष्ठान संघटनेने “डेब्रिज हटवा, आरोग्य वाचवा” या घोषणेने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

(नक्की वाचा- Dharashiv News: छेडछाडीला कंटाळून पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीची आत्महत्या)

प्रशासनाचे नेहमीचे उत्तर – “कारवाई सुरू आहे”

सिडकोच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, “आम्ही संबंधित गाड्यांवर कारवाई केली आहे. तपास चालू आहे.” मात्र प्रत्यक्षात राडारोडा आणणाऱ्या गाड्या आजही पहाटेपासून रात्रीपर्यंत धडधडत असतात, हे वास्तव नागरिक पाहत आहेत. त्यामुळे, प्रशासनाच्या कारवाईवर कोणताही विश्वास राहिलेला नाही, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

Advertisement

उलवेतील गव्हाण गावात अनधिकृतपणे राडारोडा टाकण्याच्या प्रकारामुळे पर्यावरणाची हानी तर होतेच आहे, पण स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला देखील मोठा धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणात सिडकोसह अन्य संबंधित यंत्रणांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात असून, जर तातडीने कठोर उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात हा प्रकार गंभीर सामाजिक आंदोलनात रूपांतर होण्याची शक्यता आहे.

(नक्की वाचा-  शादी डॉटकॉमवर ओळख, CEO असल्याची बतावणी अन्... उच्चशिक्षित तरुणीसोबत धक्कादायक प्रकार)

Topics mentioned in this article