Mumbai Rain BMC Flood Mitigation Project: गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुंबईसह उपनगरांमध्ये तुफान पाऊस बरसत आहे. शहरात अनेक भागात पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या, पाण्यात वाहने वाहून गेल्याच्या तसेच वाहतुकीचा खोळंबा झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. एकीकडे दरवर्षीप्रमाणे पावसामुळे मुंबईकरांचे हाल होत असतानाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
मुंबईत पावसाने हजेरी लावली की दादर, सायन, अंधेरी आणि हिंदमाता यांसारखे सखल भाग पाण्याखाली जाणार, हे जणू समीकरणच बनले होते. मात्र नेहमीच पावसाळ्यात तुंबणारा हिंदमाता परिसर यंदा तब्बल 500 मिमीहून अधिक विक्रमी पाऊस पडूनही जलमुक्त राहिला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या 'फ्लड मिटिगेशन' या गेमचेंजर प्रकल्पामुळे हे शक्य झालं आहे.
Mumbai Rain: मुंबईकरांनो लक्ष द्या! वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, समुद्रही खवळणार; BMCचं मोठं आवाहन
काय आहे फ्लड मिटिगेशन प्रकल्प? What is Flood Mitigation Project
मुंबईतील 'हिंदमाता' हा परिसर सखल भागात असल्याने, दरवर्षी पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणावर पाणी साचून जनजीवन विस्कळीत होत असे. वाहतुकीची कोंडी, दुकानांचे नुकसान आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हे पाणी साठवून ठेवण्याची किंवा उपसण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करणे, हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
हा प्रकल्प केवळ नाल्यांच्या सफाईवर अवलंबून नसून, तो आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. या प्रकल्पाचा कणा म्हणजे जमिनीखाली बांधलेल्या दोन महाकाय टाक्या. या टाक्यांची एकूण पाणी साठवणूक क्षमता ६.४ कोटी लिटर इतकी प्रचंड आहे. या टाक्यांसोबतच १५ शक्तिशाली पंप बसवण्यात आले आहेत. या पंपांची पाणी उपसण्याची क्षमता ताशी ३,००० घनमीटर (Cubic Meters per hour) इतकी आहे.
रस्त्यावर पावसाचे पाणी साचण्यापूर्वीच, जमिनीखालील विशेष पाइपलाइनद्वारे ते पाणी थेट या अंडरग्राउंड टाक्यांमध्ये वळवले जाते. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचण्याची शक्यता कमी होते. जेव्हा पाऊस थांबतो किंवा कमी होतो, तेव्हा साठवलेले पाणी पंपांच्या साहाय्याने समुद्रात किंवा मोठ्या आउटफॉलमध्ये सोडले जाते.ही प्रणाली अतिशय स्मार्ट पद्धतीने काम करते. पावसाचा जोर वाढताच आणि पाणी साचायला सुरुवात होताच, पाणी थेट या टाक्यांकडे वळवले जाते.
"हिंदमाता मॉडेल" इतर भागात लागू करण्याची मागणी
दरम्यान, यंदाच्या मुसळधार पावसातही हिंदमाता परिसर जलमुक्त राहिल्याने या प्रकल्पाची कार्यक्षमता सिद्ध झाली आहे. हा प्रकल्प जवळपास १०५ हेक्टर परिसरातील पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन करतो. अनेक वर्षे केवळ नालेसफाईवर अवलंबून राहण्यापेक्षा, हे एक कायमस्वरूपी 'इंजिनीअरिंग सोल्यूशन' ठरले. हा प्रकल्प यशस्वी ठरल्यामुळे, आता मुंबईतील इतर सखल भाग - जसे की किंग्ज सर्कल, सायन, अंधेरी सबवे, दादर, आणि कुर्ला - येथेही अशाच प्रकारचे 'मायक्रो टनेलिंग' किंवा 'अंडरग्राउंड स्टोरेज' प्रकल्प राबवण्याची मागणी जोर धरत आहे.
Mumbai Rain LIVE Blog: शिवाजी पार्कमध्ये महाकाय झाड कोसळलं, वाहतूक ठप्प; वाचा LIVE अपडेट्स