
Maharashtra Rain News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (18 ऑगस्ट 2025) मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. बैठकीमध्ये विभागीय आयुक्तांनी आपल्या विभागातील पावसाबाबतची माहिती सादर केली. रत्नागिरी, रायगड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये अधिक पाऊस झाला असून हवामान खात्याने 17 ऑगस्टपासून ते 21 ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.
दोन दिवसांत सात जणांचा मृत्यू
मागील दोन दिवसांत राज्यात विविध घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. कोकणातील काही नद्यांनी धोकापातळी ओलांडली आहे. जळगावमध्येही पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अलमट्टीबाबत कर्नाटक सरकारशी सातत्याने संपर्क ठेवला जात आहे, सध्या धोका नसला तरी यंत्रणा सतर्क ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले. मुखेडमधील परिस्थिती नियंत्रणात आली असून विष्णूपुरीकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विदर्भात पिकांचे मोठे नुकसान
छत्रपती संभाजीनगर विभागातील 800 गावे बाधित झाली आहेत. दक्षिण गडचिरोलीत प्रशासन सतर्क आहे. अकोला, चांदूर रेल्वे, मेहकर, वाशिम येथे परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. विदर्भात प्राथमिक अंदाजानुसार 2 लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे.
मुंबईत सोमवारी (18 ऑगस्ट 2025) सकाळपासून अवघ्या आठ तासांमध्ये 170 मिमी पाऊस झाला आहे. आता रेल्वे, मेट्रो आणि इतर वाहतूक सुरळीत सुरू आहे. पुढील 10 ते 12 तास मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने प्रशासनाने काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. उद्याच्या हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शाळांना सुटी जाहीर करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासन आणि महापालिकांना देण्यात आला आहे.
(नक्की वाचा: Mumbai Rain News: कोसळधारमुळे मुंबईची झाली तुंबई! रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम, धडकी भरवणारे 25 PHOTOS)
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून नागरिकांना आवाहन
मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना दिलेल्या सूचनांमध्ये, एसएमएस अलर्ट पाठवताना वेळेचा अचूक उल्लेख करावा, येणारे अलर्ट गांभीर्याने घ्यावे, स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले. तातडीच्या मदतीसाठी मंत्रालय गाठण्याची गरज नाही, स्थानिक पातळीवरच निधी आणि अधिकार देण्यात आले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
📢 मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालये यांना उद्या दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुटी !
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 18, 2025
🌧 भारतीय हवामान खात्याने उद्या मंगळवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई महानगरात (मुंबई शहर आणि उपनगरे) अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे.
🏫 या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर…
(नक्की वाचा: IMD Rainfall Colour Coded Alerts: पावसाचा रेड, ऑरेंज, यलो, ग्रीन अलर्ट नेमका अर्थ काय?)
घरांच्या पडझडीसाठीची मदत, पंचनामे योग्य पद्धतीने करण्याचे निर्देशही देण्यात आले. धोक्याची पातळी वाढण्यापूर्वी अन्य राज्यांशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पोलिसांनी सतर्क रहावे, दरडी कोसळणाऱ्या भागात आधीच यंत्रणा कार्यरत करावी तसेच निवारा केंद्रात भोजन, शुद्ध पाणी आणि पांघरूण यांची पुरेशी सोय करावी, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world