ऋतिक गणकवार, मुंबई:
Mumbai Siddhivinayak Temple Theft: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात कर्मचारीच संघटितपणे चोरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एक दोन नव्हेतर आत्तापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली असून आणखी काही लोकांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी 80 हजार रुपये हस्तगत केले आहेत.
सिद्धिविनायक मंदिरात चोरी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या सुरक्षेला आणि पावित्र्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. मंदिराच्या दानपेटीतील रक्कमेवर डल्ला मारणाऱ्या ८ कर्मचाऱ्यांना मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, हे कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही चोरी करत होते.
अशी करायचे चोरी
दानपेटी पूर्ण भरल्यानंतर ती मोजणीसाठी दुसऱ्या खोलीत नेली जाते. याच प्रवासादरम्यान आरोपी कर्मचारी हाताच्या बोटांची 'कैची' करून शिताफीने नोटा बाहेर काढत असत. हा प्रकार एका दिवसाचा नसून, कर्मचारी आळीपाळीने ही चोरी करत होते आणि नंतर मिळालेली रक्कम आपापसात वाटून घेत होते. पोलिसांनी आतापर्यंत या कारवाईत ८० हजार रुपये हस्तगत केले असून, चोरीचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राजेंद्र पेंडूरकर, शरद घाडी, समीर शिवलकर, अरविंद काडगे, अनिल राहाटे, पद्माकर आडकर, अभिषेक मुळीक आणि महेंद्र भाईजे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील काही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून काही न्यायालयीन कोठडीत आहेत. या रॅकेटमध्ये आणखी काही मोठ्या माशांचा समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यादृष्टीने पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी करत आहेत.
Ashok Kharat: अशोक खरात HIV पॉझिटिव्ह? त्या व्हायरल व्हिडीओनं खळबळ, "हजार बायका पोरं संकटात.."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world