 
                                            नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या रोजगार मेळावा या केंद्र सरकारच्या कार्यक्रमात, शोभा मधाळे आणि नवी मुंबईच्या पोस्टमास्टर जनरल सुचिता जोशी या वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांमधील खुर्ची आणि पदाच्या वादाची ‘धुसफूस' कॅमेऱ्यात कैद झाली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि विभागातील अंतर्गत कलह उघड झाला. आता याच पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळे यांच्या त्रासामुळे वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
समोर आलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या तत्कालीन पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळे यांच्या सततच्या मानसिक छळामुळे, टपाल विभागाच्या संचालक वसुंधरा गुल्हाणे - मीठे या वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. वसुंधरा यांच्या मृत्यूनंतर टपाल खात्यातील ‘ राजकारण आणि सत्तासंघर्ष' आणि महिला अधिकाऱ्यांवरील वागणुकीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
वसुंधरा गुल्हाने - मीठे यांनी १ जानेवारी २०२४ रोजी नागपूरच्या टपाल विभागात संचालक म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यावेळी शोभा मधाळे पोस्टमास्टर जनरल होत्या. कार्यालयात वारंवार अपमान, टोचून बोलणे, चरित्रावर शंका आणि नोकरी गमावण्याची भीती – या सततच्या ताणामुळे त्यांना ऑटो इम्युनिटी डिसऑर्डर झाला. ७ मे २०२५ रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि १६ मे रोजी त्यांचा मृत्यू झाला.
छळाने घेतला महिला अधिकाऱ्याचा जीव
मृत्यूपूर्वी वसुंधरांनी आपल्या छळाची संपूर्ण कहाणी आणि पुरावे लॅपटॉपमध्ये नोंदवून चौकशी अधिकाऱ्याला सुपूर्द केले होते. तरीही, आजतागायत शोभा मधाळे यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही असे त्यांचे पती पुष्पक मीठे यांनी सांगितले आहे. “माझ्या पत्नीचा मृत्यू हा अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या अधिकाऱ्याचा बळी आहे. आम्ही पाच महिन्यांपासून न्यायासाठी विनंती करत आहोत, पण सरकारकडून कोणतेही उत्तर नाही.” वसुंधरांचे पती पुष्पक मीठे एनडीटीव्ही मराठीशी बोलतांना म्हणाले..
नेरपरसोपंत गावच्या वसुंधरा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. नवोदय शाळेतील शिक्षणानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण यवतमाळला केले. त्यानंतर मुंबईच्या कॉलेजमधून बीएएमएस केले. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर २०१२ एमपीएससी थ्रू डेप्युटी कलेक्टर बनल्या. लगेच २०१३ ला यूपीएससी क्रॅक करून आयपीओएस (इंडियन पोस्टल ऑफिसर्स सर्व्हिसेस) म्हणून सिलेक्शन झाले. होशंगाबाद, नागपूर, अमरावतीला सेवा दिल्यानंतर प्रमोशनवर नागपूरला १ जानेवारी २०२४ रोजी डीपीएस म्हणून रुजू झाली. येथे पोस्टमास्तर जनरल शोभा मथाळे होत्या. ऑफिसमध्ये वारंवार अपमान, टोचून बोलणे, चारित्र्यावर शिंतोडे उडवून नोकरी धोक्यात आणण्याची भीती वसुंधरा यांना दाखवण्यात आली.
१६ महिन्यांचा तो असह्य छळ वसुंधरा पतीला सांगत होती आणि तो धीर देत होता. मात्र, सततच्या मनस्तापामुळे ऑटो युमिनिटी डिसऑर्डर हा आजार झाला. त्यांना नागपूरच्या खासगी रुग्णालयात ७ मे २०२५ ला भरती करण्यात आले. मृत्यू जवळ असल्याची जाणीव झाल्याने वसुंधराने १० मे रोजी पतीसह दोन्ही चिमुकल्यांना बोलावून घेतले. त्यांचे मनसोक्त लाड केले. कबीरचा बर्थ डे केक बेडजवळ कापला अन् १६ मे रोजी तिने सर्वांचा कायमचा निरोप घेतला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
