Nagpur Crime: लहान मुलांना फूस लावून पळवण्याचा प्लॅन असल्याच्या संशयातून एका वृद्ध महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना नागपुर जिल्ह्यातील हिंगणे येथे घडली आहे. मुल चोरण्याच्या संशयातून या वृद्ध महिलेला जमावाने घेरले अन् अमानुषपणे बेदम मारहाण केली. मात्र पोलीस तपासामध्ये ही महिला मानसिक आजारी असल्याचे स्पष्ट झाले.
मुल चोरीच्या संशयातून वृद्ध महिलेला मारहाण
समोर आलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील रायपूर परिसरात अफवेमुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सुमारे ६० वर्षांच्या एका वृद्ध महिलेला मुलं पळवणारी समजून काही महिलांनी त्यांना घेरले आणि मारहाण केली. ही घटना रायपूर येथील नेहरू विद्यालयाजवळ शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.
नक्की वाचा - Palghar News: नाकाबंदीत ट्रिपल सीट आले, मोठ्या गुन्ह्याचे बिंग फुटले, 'असा' लागला छडा
चार वर्षांची एक मुलगी किराणा दुकानाकडे जात असताना त्या वृद्ध महिलेनं तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. हे पाहून मुलीची आई आणि परिसरातील महिलांना संशय आला आणि त्यांनी त्या महिलेला पकडले. महिलेकडे एक मोठी प्लास्टिकची पिशवी आणि काही औषधे होती. त्यामुळे ती मुलीला गुंगीचे औषध देऊन पिशवीत टाकून नेणार, असा गैरसमज लोकांमध्ये पसरला. यानंतर काही महिलांनी त्या वृद्ध महिलेला मारहाण केली.
घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला जमावाच्या तावडीतून सोडवून पोलीस ठाण्यात नेले. चौकशीदरम्यान समोर आले की, ही महिला इसासनी परिसरातील रहिवासी असून त्या उपचारासाठी वानाडोंगरी येथील शालिनीताई मेघे रुग्णालयात गेल्या होत्या. परतताना त्या रस्ता विसरून रायपूर परिसरात पोहोचल्या.
पोलिसांनी कुटुंबीयांशी संपर्क साधल्यानंतर महिलेची मुले पोलीस ठाण्यात पोहोचली. संबंधित महिला मानसिक आजाराने त्रस्त असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी महिलेला त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ कोणीतरी सोशल मीडियावर ‘मुलं चोरणारी टोळी' असा मथळा देत व्हायरल केला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना कोणतीही माहिती खात्री करूनच शेअर करण्याचे आवाहन केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world