- संजय तिवारी, नागपूर
Nagpur News: नागपूर जिल्ह्यात मन हादरवणारी घटना घडलीय. खेळता खेळता अंगणवाडीच्या दुसऱ्या खोलीत गेलेला 4 वर्षांचा चिमुकला तिथेच झोपल्याने कर्मचाऱ्याने तपासणी न करताच खोलीला बाहेरून कुलूप ठोकले. यामुळे हा चिमुकला रात्रभर शाळेतच कोंडला गेला. खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोरकर लेआऊट परिसरातील ही अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे.
नागपूरमधील बोरकर लेआऊटमध्ये नेमकं काय घडलं? | Nagpur News
चिमुकला बुधवारी (18 फेब्रुवारी 2026) दुपारी खेळता खेळता अंगणवाडीच्या मागील बाजूच्या खोलीत गेला होता. तिथेच त्याला झोप लागली. संध्याकाळी शाळा सुटताना कर्मचाऱ्याने खोलीची तपासणी न करता बाहेरून कुलूप लावले. मुलगा घरी न परतल्याने पालकांनी सर्वत्र शोधाशोध करायला सुरुवात केली. पण तो कुठेच न सापडल्याने परिसरात अपहरणाची चर्चा सुरू झाली. पालकांनी तत्काळ खापरखेडा पोलीस स्टेशन गाठले.
पोलिसांची रात्रभर शोधमोहीम
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलीस उपायुक्त संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली सात पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी रात्रभर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच जवळपासचे तलाव आणि नाले पिंजून काढले. पण मुलाचा काहीच पत्ता लागत नव्हता. आई-वडिलांची अवस्था पाहून पोलीसही चिंतेत होते.
रात्रभर शोध घेऊनही काहीच हाती न लागल्याने, दुसऱ्या दिवशी सकाळी (19 फेब्रुवारी) पोलीस उपायुक्त संदीप पखाले यांनी स्वतः जाऊन अंगणवाडीची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अंगणवाडीचे कुलूप उघडायला लावले. कुलूप उघडताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. मुलगा त्याच खोलीत सुरक्षित बसलेला होता. आपल्या मुलाला पाहताच आईने हंबरडा फोडला आणि त्याला मिठी मारली.
शाळ प्रशासनाला पोलिसांचा इशाराया घटनेनंतर पोलिसांनी शाळा आणि अंगणवाडी प्रशासनाला कडक इशारा दिला आहे. शाळा बंद करताना किंवा कुलूप लावताना प्रत्येक खोलीची कसून तपासणी करणे आवश्यक आहे. अशा प्रकारचा हलगर्जीपणा पुन्हा झाल्यास कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.