Nagpur News : नागपूरच्या भारतीय बौद्ध परिषद, शांतीवन, चिचोली या संस्थेत गेल्या सहा वर्षांपासून अध्यक्षपद रिक्त आहे. जो कोणी व्यक्ती या संस्थेचा अध्यक्ष होतो, त्याचा मृत्यू होतो, असा समज असल्यामुळे अध्यक्ष नसल्याचं सांगितलं जात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुमारे ४०० वस्तूंचं संग्रहालय शांतीवन हे भारतीय बौद्ध परिषदेकडून चालवले जाते. (Indian Buddhist Council in Nagpur without president for 6 years)
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खाजगी सचिव नानकचंद रत्तू यांच्याकडे बाबासाहेबांच्या ४०० वस्तू संग्रहित होत्या. नानकचंद रत्तू यांनी नागपूरचे धम्मसेनानी वामनराव गोडबोले यांना या वस्तू सांभाळण्यासाठी आणि संग्रहालय उभारण्यासाठी दिल्या. नागपूरजवळील चिचोली येथे याच वस्तूंचं संग्रहालय उभारण्यात आलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या टाईपरायटरवर संविधानाचा मूळ मसुदा टाईप केला, तो टाईपरायटर शांतीवन येथील संग्रहालयात आहे. याशिवाय, नागपूरच्या दीक्षाभूमी येथे ज्या गौतम बुद्धांच्या मूर्तीसमोर बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेतली, ती मूर्तीही येथे आहे. सध्या या ४०० पेक्षा जास्त वस्तूंवर केंद्र सरकारच्या ‘नॅशनल रिसर्च लॅबोरेटरी फॉर कन्झर्वेशन'कडून प्रक्रिया सुरू आहे. या शांतीवन संग्रहालय प्रकल्पावर आतापर्यंत सुमारे ७५ कोटी रुपये खर्च झाले आहेत.
गेल्या ६ वर्षांपासून बौद्ध परिषदेला अध्यक्षच नाही...
बाबासाहेबांचा अमूल्य ठेवा जपणारी भारतीय बौद्ध परिषद एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. संस्थेला गेल्या अनेक वर्षांपासून अध्यक्षच नाही. जो कोणी व्यक्ती अध्यक्ष होतो, त्याचा मृत्यू होतो, असा समज असल्यामुळे कोणीही अध्यक्ष होण्यासाठी तयार नाही. गेल्या सहा वर्षांपासून भारतीय बौद्ध परिषदेला अध्यक्ष नाही. 2019 मध्ये तत्कालीन अध्यक्ष परमेश्वर राव यांचे अकाली निधन झाले. 2017 मध्ये तत्कालीन अध्यक्ष प्राध्यापक अग्नेलाल यांचे निधन झाले. 2016 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती आर आर भोळे हे संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष होते त्यांचेही अकाली निधन झाले. धर्मादाय आयुक्तांनी संस्थेला अध्यक्ष नेमण्याबाबत पत्रही पाठवले आहे. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव अध्यक्ष नेमू शकत नसल्याचं उत्तर भारतीय बौद्ध परिषदेकडून धर्मादाय आयुक्तांना देण्यात आलं आहे.
तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणाऱ्या भारतीय बौद्ध परिषद, शांतीवन, चिचोली या संस्थेला अध्यक्ष नसणे आणि त्यामागे अंधश्रद्धेसारखे कारण असणे, यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनीही आक्षेप घेतला आहे.
एखादी इमारत किंवा घर तिथं कुणी राहायला गेले की मृत्यू होतो अशा काही अंधश्रद्धा लोक ठेवतात पण याला काही शास्त्रीय आधार नाही. अनेकदा एखादा मुख्यमंत्री कमी वेळात पायउतार झाला तर तो राहत असलेल्या इमारतीत दुसरा मुख्यमंत्री राहायला जात नाही. अशा सर्व अंधश्रद्धा आहे. एखादा रोड वळणदार असतो किंवा धोकादायक असतो त्यामुळं अपघात होतात. पण लोक त्याला अपशकुनी रस्ता म्हणतात. या संस्थेच्या बाबतीत असं होणं हे बाबासाहेब आणि गौतम बुद्ध यांच्या विचाराचा अपमान असल्याची टीका केली जात आहे. गैरसमज किंवा अंधश्रद्धेमुळे अशा प्रकारच्या गोष्टी बोलल्या जातात. मात्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या विचारांना पुढे नेण्याचं काम करणाऱ्या संस्थेकडून अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे त्यांच्या विचारांचा अपमान ठरेल, अशी टीका होत आहे.
भारतीय बौद्ध परिषदेच्या काही विश्वस्तांचं म्हणणं काय आहे?
कोणत्याही व्यक्तीचा जीव आम्हाला धोक्यात घालायचा नाही. एखाद्या व्यक्तीला अध्यक्ष केलं आणि त्याचा मृत्यू झाला, तर त्याला जबाबदार कोण? असा प्रतिप्रश्न ही भारतीय बौद्ध परिषदेकडून विचारण्यात आला आहे. आता या संपूर्ण प्रकरणात समज , गैरसमज, योगायोग, अंधश्रद्धा, कायदा, राज्यघटना तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांचे विचार या सर्वांचा विचार करून योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world