Nagpur-Pune sleeper Vande Bharat Railway : गेल्या अनेक दिवसांपासून नागपूर–पुणे स्लीपर वंदे भारत रेल्वेची मागणी केली जात होती. लवकरच याची सुरुवात होणार असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे याच महिन्यात नागपूर-पुणे स्लीपर वंदे भारत रेल्वे सुरू होणार असल्याची माहिती आहे.
नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या या स्लीपर वंदे भारत गाडीची सुरुवात होण्यासंदर्भातील हालचाली सुरू झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑगस्ट महिन्यातच तीन नव्या स्लीपर वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखविण्यात येणार असल्याची माहिती आहे. यात अजनी–पुणे, बेंगळुरू–बेळगाव आणि श्री माता वैष्णोदेवी कटरा–अमृतसर या मार्गांवरील स्लीपर वंदे भारत गाड्यांचा समावेश आहे.
नागपूर–पुणे हा रेल्वे मार्ग अतिशय व्यस्त असल्याने नागपूर–पुणे विमानसेवा आणि खाजगी बससेवा यांचे भाडे मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे या नव्या स्लीपर वंदे भारतमुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
नक्की वाचा - Gadchiroli News : स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतर नक्षलवादी नियंत्रित गावात पोहोचली सरकारी बस, गावकऱ्यांमध्ये उत्साह
पुणे ते नागपूर यादरम्यान रेल्वेने 12 ते 13 तासांचं अंतर लागते. वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्याने नागपूर ते पुणे अंतर दोन ते तीन तासांनी कमी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी वंदे भारत स्लीपर कोच धावण्याची शक्यता आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेनचा कोणकोणत्या स्थानकांवर थांबा
- दौंड
- अहिल्यानगर
- कोपरगाव
- मनमाड
- जळगाव
- भुसावळ
- अकोला
- बडनेरा
- वर्धा