Nagpur Youth Brain Stroke: नागपुरात अतिव्यायामामुळे मेंदूतील रक्तवाहिनी फुटून अर्धांगवायूचा झटका आलेल्या २३ वर्षीय ओम भोयर याला डॉक्टरांनी ‘गोल्डन अवर'मध्ये शस्त्रक्रिया करून वाचवले. १० एप्रिल रोजी ओम भोयर हा २३ वर्षांचा तरुण जिममध्ये अनेक तास व्यायाम करून घरी परतला. मात्र, काही वेळातच तो अचानक बेशुद्ध पडला. सुदैवाने डॉक्टरांनी ‘गोल्डन अवर'मध्ये शस्त्रक्रिया करून वाचवले. नेमकं काय घडलं? वाचा...
अतिव्यायामाने केला घात, तरुण थेट मृत्यूच्या दारात!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, व्यायामाचे वेड आणि शरीर कमावण्याची ओढ कधी अंगलट येईल याचा नेम नाही. नागपूरमधील २३ वर्षीय ओम भोयर या तरुणाला अशाच एका अतिव्यायामाने मृत्यूच्या दारात नेऊन उभे केले होते. जिममध्ये तासनतास घाम गाळल्यानंतर ओमच्या मेंदूतील रक्तवाहिनी फुटून त्याला अर्धांगवायूचा (पॅरालिसिस) तीव्र झटका आला. मात्र, वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती आणि आईचे प्रसंगावधान यामुळे 'गोल्डन अवर'मध्ये उपचार मिळाल्याने या तरुणाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
१० एप्रिल रोजी ओम नेहमीप्रमाणे जिममध्ये व्यायाम करून घरी परतला होता. मात्र, काही वेळातच तो अचानक कोसळला आणि बेशुद्ध पडला. ओमची आई आरती भोयर या व्यवसायाने परिचारिका (नर्स) असल्याने त्यांनी तत्काळ या घटनेचे गांभीर्य ओळखले. हा प्रकार अर्धांगवायूचा असू शकतो, हे लक्षात येताच त्यांनी कोणतीही वेळ न घालवता तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर केलेल्या तपासणीत ओमच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याचे आणि रक्ताची गाठ तयार झाल्याचे निष्पन्न झाले.
'गोल्डन अवर'मधील उपचाराने वाचवले प्राण
प्रसिद्ध मज्जातंतू विकार तज्ज्ञ डॉ. सचिन ढोमणे यांनी तातडीने 'मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी' ही आधुनिक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या प्रक्रियेद्वारे मेंदूतील अडथळा निर्माण करणारी गाठ काढून रक्तप्रवाह पुन्हा सुरळीत करण्यात आला. सुरुवातीला ओमची प्रकृती चिंताजनक होती, मात्र योग्य उपचार आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर २१ एप्रिल रोजी तो स्वतःच्या पायावर चालत घरी परतला. "अतिव्यायामामुळे रक्तदाब अचानक वाढून अशा दुर्घटना घडू शकतात, त्यामुळे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच व्यायाम करावा," असा सल्ला डॉक्टरांनी यावेळी दिला.
एका चितेवर 3 सख्ख्या भावा-बहिणींवर अंत्यसंस्कार; अंगावर काटा आणणारं दृश्य
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world