
नाशिक: नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याला भाविकांची होणारी अलोट गर्दी व वाहतूक व्यवस्थेसंदर्भात लागणाऱ्या रस्त्यांच्या सुविधा, आवश्यक रस्त्यांची निर्मिती ही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयामार्फत करण्यास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली. याबाबत लवकरच डीपीआर करून त्याला निधी उपलब्ध करून दिला जाईल असा निर्णय नाशिक सिंहस्थ कुंभमेळा बैठकीत घेण्यात आला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कुंभमेळाप्रती भाविकांची वाढती आस्था व होणारी गर्दी लक्षात घेऊन त्याचे यशस्वी नियोजन, पायाभूत रस्ते विकासाच्या सक्षमिकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना केंद्र शासनाच्या पातळीवर मदत व्हावी अशी विनंती केली होती. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आज केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र शासन व सर्व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथील मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या व्यापक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार स्मिताताई वाघ, आमदार देवयानी फरांदे आमदार मंगेश चव्हाण, सडक परिवहन मंत्रालयाचे सचिव व्ही उमाशंकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे, नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नाशिकला जवळपास महत्त्वाचे आठ मार्ग येतात. यात मुंबई, गुजरात, पालघर, पुणे, अहिल्यानगर, संभाजीनगर, धुळे या मार्गाने भाविक येतात. हे सर्व मार्ग कुंभच्या काळामध्ये महत्त्वाचे आहेत. याला जोडून नाशिकमधील व जिल्ह्यातील अंतर्गत रस्ते देखील राष्ट्रीय महामार्गाला जोडणारे आहेत. त्या सर्व रस्त्यांच्या विकासासंदर्भात बैठकीत विचार करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जवळपास सर्व रस्त्यांना तत्वतः मान्यता दिलेली आहे. लवकरच त्यासाठी करून त्याला निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि ते काम पूर्ण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
या मार्गाचा होणार विकास
१) घोटी – पाहिने – त्रिंबकेश्वर – जव्हार फाटा
२) द्वारका सर्कल – सिन्नर आयसी २१ (समृद्धी एक्सप्रेसवे) नांदूर शिंगोटे – कोल्हार
३) नाशिक ते कसारा
४) सावली विहीर (आय सी २० समृद्धी एक्सप्रेसवे) शिर्डी – शनिशिंगणापूर फाटा ( राहुरी खुर्द)
५) नाशिक ते धुळे
६) त्र्यंबकेश्वर – जव्हार – मनोर
७) सावली विहीर – मनमाड – मालेगाव
८) घोटी – सिन्नर – वावी – शिर्डी
९) शनिशिंगणापूर फाटा (राहुरी खुर्द) – अहिल्यानगर (खरवंडी फाटा)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world