जाहिरात

Crypto : क्रिप्टो गुंतवणूक सायबर चोरांच्या टार्गेटवर; नवी मुंबईत 1 कोटींची फसवणूक, तक्रारदाराची ही एक चूक भोवली!

सायबर चोरांपासून तुम्ही स्वत:चा बचाव कसा करू शकाल? सायबर पोलिसांचा महत्त्वपूर्ण सल्ला...

Crypto : क्रिप्टो गुंतवणूक सायबर चोरांच्या टार्गेटवर; नवी मुंबईत 1 कोटींची फसवणूक, तक्रारदाराची ही एक चूक भोवली!

राहुल कांबळे, प्रतिनिधी

क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस परतावा मिळेल, अशा अमिषाने तब्बल 1 कोटी 3 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पनवेल सायबर सेलच्या गुन्हे अन्वेषण शाखेने तांत्रिक तपासाअंती जुबेर शमशाद खान (वय 34) याला मुंब्रा येथून अटक केली आहे.

फसवणुकीचा पद्धतशीर प्रकार

आरोपीने फेसबुकवर बनावट प्रोफाइल तयार करून, क्रिप्टो गुंतवणुकीद्वारे भरघोस नफा मिळेल, अशी पोस्ट केली. पीडित व्यक्तीने या पोस्टवर विश्वास ठेवून संपर्क साधला. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपवर संवाद सुरू झाला. आरोपीने खोटं नाव, बनावट छायाचित्रे व बनावटी ओळख सादर करत पीडिताचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला काही रक्कम परत देत परताव्याचा आभास निर्माण केला.

यामुळे गाफील झालेल्या पीडिताने टप्प्याटप्प्याने 78.82 लाख रुपये आरोपीच्या सांगण्यानुसार पाठवले. मात्र त्यानंतर कोणताही परतावा न मिळाल्याने, तसेच आरोपीने संपर्क तोडल्याने फसवणुकीचा उलगडा झाला. पीडित व्यक्तीने खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Crime News : 41 लाखांची लाच, घरात 50 लाखांचं सोनं; संभाजीनगरच्या लाचखोर उपजिल्हाधिकाऱ्याविरोधात मोठी कारवाई

नक्की वाचा - Crime News : 41 लाखांची लाच, घरात 50 लाखांचं सोनं; संभाजीनगरच्या लाचखोर उपजिल्हाधिकाऱ्याविरोधात मोठी कारवाई

गुन्हा आणि अटक

खारघर पो.ठा. येथे गु.क्र. 203/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 318(4) व माहिती तंत्रज्ञान कायदा 2008 चे कलम 66(D) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पनवेल सायबर सेलच्या पथकाने आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढत, मुंब्रा येथे सापळा रचून अटक केली.

अटकप्रसंगी आरोपीकडून एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. या मोबाईलमध्ये पीडिताशी संबंधित चॅटचे व आर्थिक व्यवहाराचे डिजिटल पुरावे सापडले आहेत. प्राथमिक तपासात आरोपीने ₹1.03 कोटी रुपये घेतल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आर्थिक व्यवहाराचा मागोवा घेणे सुरू केले असून, इतर सहआरोपी असल्याची शक्यता नवी मुंबई पोलिसांन कडून वर्तवली जात आहे.

फसवणूक का घडते?

🔹 डिजिटल अज्ञान – ऑनलाईन व्यवहारांबाबत पुरेशी माहिती नसणे
🔹 जलद पैसे कमावण्याचे स्वप्न – क्रिप्टो, शेअर, ट्रेडिंग, लॉटरी यांसारख्या आमिषांची मोहिनी
🔹 अधिकृत प्लॅटफॉर्मचा अभाव – थेट खात्यांत व्यवहार केल्याने धोका वाढतो
🔹 सतत बदलत जाणाऱ्या फसवणुकीच्या पद्धती – तांत्रिक गुन्हेगार अधिक स्मार्ट होत चालले आहेत


नागरिकांसाठी सायबर सेलचा इशारा

पनवेल सायबर सेलने नागरिकांना सोशल मीडिया, ईमेल, व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम आणि अन्य ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील क्रिप्टो गुंतवणूक योजनांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

  •  अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावर पैसे पाठवू नयेत
  •  फक्त अधिकृत क्रिप्टो एक्सचेंज किंवा SEBI नोंदणीकृत प्लॅटफॉर्मचा वापर करावा
  •  कुठलाही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी सल्लागारांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक.

तुमची सुरक्षा, तुमच्याच हाती — सायबर गुन्ह्यांपासून सावध राहा!

सायबर क्राईम मदत क्रमांक: 1930
तक्रारीसाठी संकेतस्थळ: www.cybercrime.gov.in
संपर्क: सायबर पोलीस ठाणे, नवी मुंबई

Listen to the latest songs, only on JioSaavn.com