
राहुल कांबळे, नवी मुंबई: IPO आणि Index Trading मध्ये जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ४.७१ कोटी रुपयांची सायबर फसवणूक करणाऱ्या दोघा आरोपींना नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्याने अटक केली आहे. या गुन्ह्यात महाराष्ट्रासह इतर राज्यांतील किमान १० सायबर फसवणूक प्रकरणांमध्ये आरोपींचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी सायबर पोलीस ठाणे, नवी मुंबई येथे गुन्हा रजि. क्र. 10/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 319 (2), 318 (4), 4(5) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66(डी) अंतर्गत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. Rading मध्ये जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत, आरोपींनी 30 नोव्हेंबर 2024 ते 5 मार्च 2025 या कालावधीत सातत्याने विश्वास संपादन केला. त्यानंतर गुंतवणूक म्हणून वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. एकूण 4,71,65000 रुपये या प्रकारे ऑनलाईन फसवले गेले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तांत्रिक तपासातून आरोपी गजाआड
गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम सायबर पोलीस ठाणे नेरुळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहित बंडगर यांच्या पथकाने सखोल तांत्रिक तपास केला. बँक खात्यांचा तपशील, फंड ट्रान्सफरचा मागोवा, मोबाईल डेटा व IP अॅड्रेस यांच्या साहाय्याने गुन्ह्यातील मुख्य आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.
तपासात विकास प्रकाश गव्हाणे (वय 26, व्यवसाय- इस्टेट एजंट, रा. करंजाडे) यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याचा साथीदार मनोज विष्णु कालापाड (वय 22, शिक्षण- बीए, रा. मालेगाव, जि. वाशिम) यालाही ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपींना 7 जून 2025 रोजी दुपारी 12.01 वाजता अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
(नक्की वाचा : Mumbai Local Train Accident : .... तर मुंब्रातील अपघात टळला असता, 'त्या' तक्रारीकडील दुर्लक्ष भोवलं? )
पोलिस कोठडीत त्यांच्याकडून सखोल चौकशी सुरू असून, गुन्ह्यात सहभागी इतर टोळी सदस्यांबाबत शोधकार्य सुरू आहे. या आरोपींचा महाराष्ट्रासह इतर राज्यांतील 10 सायबर फसवणूक प्रकरणांमध्ये सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. फसवणूक करताना आरोपी फेक वेबसाइट्स, बनावट डिमॅट खात्यांचे इंटरफेस, ग्राहक सेवेच्या नावाखाली बनावट कॉल सेंटर्स आणि WhatsApp च्या माध्यमातून गुंतवणूक सल्ले देत असत.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर सायबर पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की, सोशल मीडियावरून किंवा WhatsApp वरून मिळणाऱ्या गुंतवणुकीच्या ऑफरवर विश्वास ठेवू नका. कधीही ओळखीबाहेरच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू नका. अधिकृत वेबसाईट व सेबी नोंदणीकृत दलालांमार्फतच गुंतवणूक करावी. तक्रार असल्यास लगेच जवळच्या सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधा किंवा 1930 हेल्पलाईनवर कॉल करा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world