शुभम बायास्कार, प्रतिनिधी
Navneet Rana News : भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा या नेहमीच त्यांच्या आक्रमक वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी एका वादग्रस्त विषयाला हात घातला असून लोकसंख्येच्या मुद्द्यावरून हिंदूंना एक आवाहन केले आहे. एका मुस्लिम मौलानाने केलेल्या वक्तव्याचा दाखला देत नवनीत राणा यांनी हिंदू कुटुंबातील मुलांच्या संख्येबाबत त्यांचे मत मांडले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
काय म्हणाल्या नवनीत राणा?
नवनीत राणा यांनी मौलाना सय्यद कादरी यांच्या एका कथित विधानाचा संदर्भ दिला. मौलानाने आपल्याला 4 पत्नी आणि 19 मुले असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे, असे राणा म्हणाल्या. ते लोक इतक्या मोठ्या संख्येने मुले जन्माला घालत असतील आणि उघडपणे तसे सांगत असतील, तर हिंदूंनी केवळ एका मुलावर का समाधान मानावे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हिंदुस्थानला पाकिस्तान बनवण्याचा त्यांचा विचार असल्याचे सांगत, प्रत्येक हिंदू कुटुंबाने किमान 3 ते 4 मुले जन्माला घातली पाहिजेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
( नक्की वाचा : Amaravati News : आमदार संजय खोडकेंना कारची धडक; मणक्याला बसला मार, हॉस्पिटलमधून दिला 'हा' संदेश, पाहा Video )
धर्म ध्वजावर बोट उचलणाऱ्यांना इशारा
यापूर्वी अमरावतीमधील एका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक रॅलीत बोलताना नवनीत राणा यांनी अत्यंत जहाल भाषेत इशारा दिला होता. जो कोणी आपल्या धर्म ध्वजाकडे वाकड्या नजरेने बघेल किंवा बोट उचलेल, त्याची बोटं कापली पाहिजेत, असे त्या म्हणाल्या होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 नोव्हेंबर 2025 रोजी अयोध्या येथे धर्म ध्वज फडकवला, त्यावर पाकिस्तानकडून टीका केली जात असल्याचा संदर्भ त्यांनी दिला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेचाही उल्लेख केला आणि आपण सर्वांनी एकत्र राहून सुरक्षित राहिले पाहिजे, असा संदेश दिला.
( नक्की वाचा : Tuljapur Nagar Parishad : तुळजापूरचा गड भाजपने राखला, ड्रग्ज प्रकरणाच्या आरोपांनंतरही गंगणेंनी मैदान मारलं )
पवार कुटुंबीयांच्या एकत्र येण्यावर भाष्य
राजकीय विषयावर बोलताना नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवर आणि शरद पवार यांच्यावरही मत मांडलं शरद पवार हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत आणि अजित पवार यांच्यासह पूर्ण पवार कुटुंब हा त्यांचा वैयक्तिक परिवार आहे, असे त्या म्हणाल्या. अजित पवार यांनी आधीच स्पष्ट केले होते की, भाजपसोबत जाण्याचा सल्ला त्यांना शरद पवार यांनीच दिला होता. त्यामुळे जर दोन्ही पवार पुन्हा एकत्र येत असतील, तर ही चांगलीच गोष्ट आहे, असे मत नवनीत राणा यांनी व्यक्त केले.