सातारा: राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु आहे. विधानसभेच्या प्रचारात वोट जिहादचा आरोप भाजप नेत्यांकडून होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या जाहीर सभांमधून वोट जिहादवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या वोट जिहादवरील वक्तव्याचा आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
काय म्हणाले शरद पवार?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी वोट जिहादवरुन देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला. जिहाद हा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी काढलेला आहे. याचं कारण म्हणजे मायनॉरिटीज नी महाविकास आघाडीला मतदान केले. देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रकारचा धार्मिक कलह माजवण्याचा प्रयत्न या निवडणुकीत केलेला दिसत आहे, असे खडेबोल शरद पवार यांनी सुनावले.
नक्की वाचा: 'तुझ्या नावावर मते माग...', अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र पवारांना खोचक टोला
अजित पवारांना उत्तर..
यावेळी बोलताना शरद पवार यांनी अजित पवार यांच्या साहेबांनंतर मीच बारामती सांभाळणार? या वक्तव्याचाही समाचार घेतला. अजित पवारांना बारामतीत लोकांनी मत दिली नाहीत उद्या कोणी म्हणत असेल मी देशाचा प्रमुख तर मी त्याबद्दल काय बोलणार? पण यावर लोकांनी बोललं पाहिजे. असं ते म्हणाले. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल, अशी खात्री आहे. असा विश्वासही यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केला. लोकसभेच्या निवडणुकीला लोक शांत होते रिऍक्ट होत नव्हते मात्र यंदाच्या निवडणुकीत लोक बाहेरून बोलत आहेत, असा अनुभवही त्यांनी सांगितला.
पंतप्रधान मोदींना टोला..
'मी अनेक पंतप्रधानांची भाषण ऐकली. माझ्या कॉलेजच्या काळात जवाहरलाल नेहरू जे पंतप्रधान होते त्यांचेही भाषण मी ऐकले.. पंतप्रधानांचे भाषण हे वास्तविक विकासात्मक असावा लागते. मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी सुरुवात 400 जागा नी केली 400 जागा कशासाठी ? मोदींना घटनेमध्ये सुधारणा करण्यासाठी 400 जागा हव्या होत्या.. ' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.