देवा राखुंडे, बारामती: राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे ते बारामती मतदारसंघाकडे. बारामतीमध्ये काका विरुद्ध पुतण्याच्या लढाईत कोण बाजी मारणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एकीकडे युगेंद्र पवार यांचा प्रचार जोरात सुरु असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवारही गावोगावी दौरे करत आहेत. अशातच आज बारामतीमध्ये मतदारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांच्यावर निशाणा साधताना एक महत्वाचे विधान केले आहे.
काय म्हणाले अजित पवार?
'नातू आजोबा एका बाजूला आणि पुतण्या एकीकडे आमच्या घरातच फूट पडली आहे. तुम्हाला इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकसभेला आडाकडं बघितले, विधानसभेला विहिरीकडे बघा. म्हणजे आड पण खुश अन् विहिरही खुश. तुम्ही साहेबांना मतदान केले आता मला करण्याच्या विचारात आहात. लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा तुम्ही ठरवले होते. माझ काही म्हणणं नाही, त्या त्या ठिकाणी काम करतील मी मी माझ्या ठिकाणी काम करेल. जितके जास्त मतदान द्याल तितके जास्त निधी देऊ.. ' असं अजित पवार यावेळी म्हणाले..
तसेच यावेळी बोलताना त्यांनी युगेंद्र पवार यांच्या बॅनरकडे बोट दाखवत खोचक टोलाही लगावला. आता इथे बघा ना साहेबांचा फोटो लावला आहे. साहेब उभे आहेत का? नाही ना ? जो उभा आहे त्याचा लाव ना? तुझ्या नावावर मते माग ना? साहेबांच्या नावावर आजपर्यंत तुम्ही मते दिलीच आहेत. ही निव्वळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका त्यांनी केली. तसेच साहेबांच्या नंतर बारामती मीच सांभाळणार आहे, असे मोठे विधानही अजित पवार यांनी केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world