सागर कुलकर्णी,
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे नाराज आहेत. मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने त्यांनी अजित पवार यांच्यावर नाराजी दर्शवली आहे. अशातच आता ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाचे विधान केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले छगन भुजबळ?
'आज मी आणि समीर भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यामध्ये सामाजिक, राजकीय विषयावर चर्चा झाली. वर्तमानपत्रातून आणि मीडियामधून मी बऱ्याच गोष्टी मी पाहिल्यात असं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी सांगितले की महायुतीला मिळालेला महाविजयामध्ये ओबीसी पाठबळाचा मोठा वाटा आहे. ओबीसींनी आपल्याला आशीर्वाद दिला, याचे आभार मानलेच पाहिजेत, असं त्यांनी सांगितले.
'म्हणूनच मी ओबीसींचे नुकसान होऊ देणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे, मी ओबीसींचे नुकसान होऊ देणार नाही. पुढच्या 8- 10 दिवसानंतर आपण भेटू आणि यामधून मार्ग काढू. मी यावर साधक- बाधक विचार करतो आहे. येत्या 10- 12 दिवसात मार्ग काढू, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाल्याचा सर्वात मोठा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे.
दरम्यान, यावेळी पत्रकारांनी छगन भुजबळ यांना राष्ट्रवादीसोडून भाजपमध्ये प्रवेश करणार का? असा सवाल केला. यावर त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं की ओबीसीचे नुकसान आम्ही होऊ देणार नाही. त्यामुळे यावर आता मी जास्त काही बोलू शकत नाही यापूर्वी मी सगळं बोललो आहे. पुढील काळात अधिक स्पष्ट होईल, असं म्हणत राष्ट्रवादीमध्ये भूकंप होणार असल्याचे सूचक संकेत दिलेत.