
World Womens Day 2025: आज जगभरात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. महिलांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्याविषयी असलेल्या आदरयुक्त भावनेचा सन्मान करण्याचा आजचा दिवस. दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या भयंकर घटनांनी खळबळ उडाली आहे. राज्यातील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर संताप व्यक्त करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहित मोठी मागणी केली आहे. त्यांच्या या पत्राने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे रोहिणी खडसेंचे पत्र?
मा. द्रौपदी मूर्मू राष्ट्रपती, भारत
विषय :- एक खुन माफ करणेबाबत
महोदया, सर्वात प्रथम आपल्याला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो. जे शांतीचे अहिंसेचे मोठे प्रतीक आहे तरी आपली क्षमा मागून वरील मागणी करत आहे. कारणही तसेच आहे. आज देशात महिला मोठ्या प्रमाणात असुरक्षित आहेत. येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ होत आहे. दोनच दिवसांपूर्वी पूर्वी देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे एका १२ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले. राष्ट्रपती महोदया, १२ वर्षीय ! विचार करा काय परिस्थिती असेल ?
(नक्की वाचा- कशाला एवढं ताणता, जीवावर उठता का? तो फोन... आपल्यासोबत बरंवाईट होणार हे देशमुखांना कळलं होतं?)
नुकताच वर्ल्ड पॉपुलेशन रिव्यू सर्व्हे आला आहे अशा बातम्या आम्ही वाचल्या. या सर्व्हेमध्ये महिलांसाठी असुरक्षित असलेल्या जगातील विविध देशांचा उल्लेख केला आहे. या सर्व्हे नुसार आशिया खंडात भारत सर्वात असुरक्षित देश असल्याचे म्हटले गेले आहे. महिलांचे अपहरण, महिला बेपत्ता होण्याचे प्रकार, घरगुती हिंसाचार आणि अन्य गंभीर विषयांचाही समावेश आहे त्यामुळे आम्हाला एक खुन माफ करा अशी आम्ही समस्त महिलांच्या वतीने मागणी करतो.
आम्हाला खुन करायचा आहे अत्याचारी मानसिकतेचा, बलात्कारी प्रवृत्तीचा, निष्क्रिय असलेल्या कायदा सुव्यवस्थेचा. महोदया, आपल्या राज्यावर, देशावर संकट आले म्हणून महाराणी ताराराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तलवार उपसली होती मग आमचा समाज सुधारण्यासाठी आम्ही का मागे राहावे. आमच्या मागणीचा यथोचित विचार करून आपण आमची मागणी मान्य कराल ही अपेक्षा करते. हीच तुमच्याकडून आम्हाला जागतिक महिला दिनाची भेट समजू, असं त्यांनी या पत्रामध्ये म्हटले आहे.
(नक्की वाचा- Santosh Deshmukh Case: 'बोल सुदर्शन घुले बाप..., 'त्या' 15 व्हिडिओंची A to Z स्टोरी; वाचून काळजाचा थरकाप उडेल)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world