एनडीटीव्हीच्या वैभवशाली परंपरेतील नवा अध्याय सुरु झालाय. 'NDTV मराठी' चॅनलचं (NDTV Marathi Launch) लोकार्पण झालंय. 'नव्या महाराष्ट्राचा नवा आवाज' या टॅगलाईनसह हे चॅनल लॉन्च झालं आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मुंबईत झालेल्या खास लोकार्पणाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. 'कोणत्याही चॅनलनं संतुलन राखणे आवश्यक आहे. अजेंडा चालवू नये. जितका जास्त ओरिजनल कंटेट देता येईल तितका द्यावा,' अशी अपेक्षा फडणवीस यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली. मुंबईतील 'ताज लँडस एंड'मध्ये झालेल्या लोकार्पण कार्यक्रमात अदाणी एंटरप्रायजेसचे संचालक प्रणव अदाणी आणि NDTV ग्रुपचे 'एडिटर इन चीफ' संजय पुगलिया देखील स्टेजवर उपस्थित होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
फडणवीसांची मोठी घोषणा
NDTV मराठीच्या लोकार्पण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली. पालघर लोकसभेची जागा भाजपा लढेल असं फडणवीस यांनी जाहीर केलं. पालघरमधील उमेदवार आज किंवा उद्या (बुधवार किंवा गुरुवार) जाहीर होईल, असं फडणवीस यांनी सांगितलं. महायुतीमधील जागावाटपांच्या चर्चेबाबतही फडणवीस यांनी यावेळी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
आम्हाला ठाणे आणि दक्षिण मुंबई या जागा हव्या होत्या. आमच्या कार्यकर्त्यांचा त्यासाठी आग्रह होता. या जागा वर्षानुवर्ष आमच्या राहिल्या आहेत, अशी त्यांची भूमिका होती. आमचाही काही युक्तीवाद होता. सर्व युक्तीवाद झाल्यानंतर अंतिम जो निर्णय झाला त्याला आम्ही बांधील आहोत, त्यामध्ये कुणाची मनधरणी करण्याचा प्रकार घडला नाही. आम्ही बैठका बऱ्यापैकी केल्या, दोन्ही बाजूनं युक्तीवाद झाले पण, निर्णय एकमतानं झाला असं फडणवीस यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं.
( नक्की वाचा : पालघरची जागा भाजपा लढवणार, 'NDTV मराठी' च्या लोकार्पण कार्यक्रमात फडणवीसांची घोषणा )
महाराष्ट्रातील नकारात्मकता दूर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. निवडणूक प्रचाराच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकार्पण सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी NDTV मराठीच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी NDTV मराठीला खास मुलाखत दिली. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे सरकारवही टीका केली. महाराष्ट्रात दोन वर्षात मागे वळून पाहिलं तर अटल सेतू प्रकल्प, मुंबईचा कोस्टल रोडचा पहिला टप्पा, समृ्द्धी महामार्ग, मुंबई-पुणे महामार्गावर मिसिंग लिंकमुळे अशी विकास कामे वेगाने झाली आहेत. मुंबईत मेट्रोची कामं वेगाने सुरु आहे. मधल्या काळात हे काम थांबलं होतं. कुणामुळे या कामात अडथळा आला, यावर मी फार बोलणार नाही. राज्यकर्त्यांनी कामे करताना इगो मधे आणू नये. त्यामुळे मधल्या अडीच वर्षात महाराष्ट्रात जी नकारात्मकता होती ती निघून गेली आहे, असा टोला शिंदे यांनी लगावला.
( नक्की वाचा : "आमचं सरकार आल्याने अडीच वर्षांची नकारात्मकता गेली"; 'NDTV मराठी'वर CM एकनाथ शिंदेंची खास मुलाखत )
निवडणूक लढवणं जड - पटेल
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री प्रफुल पटेल देखील लोकार्पण कार्यक्रमात उपस्थित होते. यापूर्वीच्या निवडणुकीत लोकापर्यंत पोहचण्यासाठी कष्ट घ्यावे लागत होते. आता लोकापर्यंत पोहोचणं सोपं झालंय पण, निवडणूक लढवणं अवघड झालंय, असं मत पटेल यांनी व्यक्त केलं.
महाराष्ट्रातील प्रत्येक लहान-मोठ्या बातमीसाठी पाहा 'NDTV मराठी'
सध्याचं युग हे डिजिटल युग आहे. डिजिटल कंटेट पाहण्याचं प्रमाण गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढलंय. आगामी काळात देखील हा ट्रेन्ड कायम राहणार आहे. त्यामुळे NDTV मराठी चॅनल टीव्हीसह डिजिटल प्लॅटफॉर्मवरही पाहता येईल. NDTV मराठी ची वेबसाईट 'http://marathi.ndtv.com' शानदार पद्धतीनं लॉन्च करण्यात आली. marathi.ndtv.com वर तुम्ही प्रत्येक लहान-मोठी बातमी वाचू आणि पाहू शकणार आहात. NDTV ग्रुपच्या डिजिटल ट्रॅफिकमध्ये गेल्या तिमाहीमध्ये 39 टक्के वाढ झाली आहे.
बातम्यांच्या विश्वावर NDTV चा ठसा
बातम्यांच्या विश्वात NDTV ग्रुपचा वेगानं विस्तार होत आहे. काही महिन्यांपूर्वी NDTV राजस्थान आणि NDTV मध्य प्रदेश- छत्तीसगड ही दोन चॅनल लॉन्च झाली. त्याचबरोबर NDTV Profit हे बिझनेस चॅनल देखील री-लॉन्च झालं आहे. NDTV मराठीच्या आगमनानंतर ग्रुपमधील एकूण वाहिन्यांची संख्या 2 वरून 6 झाली आहे.