जाहिरात

NEET Result: ना कोटा, ना कोणतं मोठं शहर... बारामतीतच अभ्यास करणारी श्रावणी देशात पाचवी , वाचा Success Story

NEET UG results 2026 : नीट-युजी (NEET-UG) परीक्षेचा पेपर लीक झाल्याच्या वादानंतर परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय झाला, तेव्हा श्रावणीनं डोळ्यात पाणी न आणता पुस्तके पुन्हा हातात घेतली.

NEET Result: ना कोटा, ना कोणतं मोठं शहर... बारामतीतच अभ्यास करणारी श्रावणी देशात पाचवी , वाचा Success Story
NEET UG results 2026 : जिल्हा परिषद शिक्षकाची मुलगी ते देशातील टॉपर असा श्रावणीचा हा थक्क करणारा प्रवास आहे.
मुंबई:


NEET UG results 2026 : देशभरातील मेडिकल कॉलेजच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या 'नीट' परीक्षेला यंदा पेपर फुटीचे गालबोट लागले. पेपरफुटीमुळे संपूर्ण परीक्षाच रद्द झाली. तसंच पुन्हा घेण्याची नामुश्की सरकारवर आली. या सर्व प्रकरणात काही आरोपींना अटक झाली आहे. त्या सर्वांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरु आहे. पण, पेपर फुटीच्या या दुष्टचक्रात देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यांना पुन्हा एकदा परीक्षेला सामोरं जावं लागलं. संपूर्ण नकारात्मक परिस्थितीमध्ये खचून जाणं हे अगदी स्वाभाविक आहे. काही विद्यार्थ्यांनी दुर्दैवानं टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली. पण बारामतीच्या एका 18 वर्षांच्या मुलीने या संकटालाच संधीमध्ये बदलले. 

नीट-युजी (NEET-UG) परीक्षेचा पेपर लीक झाल्याच्या वादानंतर जेव्हा परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय झाला, तेव्हा तिने डोळ्यात पाणी न आणता पुस्तके पुन्हा हातात घेतली. आज याच जिद्दीच्या जोरावर ती सुधारित नीट परीक्षेत देशातील सर्व मुलींमध्ये पहिली आली असून तिने ऑल इंडिया रँक 5 मिळवला आहे. श्रावणी कुदळे असे या बारामतीच्या लेकीचं नाव असून तिने 720 पैकी तब्बल 710 गुण मिळवून संपूर्ण महाराष्ट्राचे नाव देशभरात उंचावले आहे.  जिल्हा परिषद शिक्षकाची मुलगी ते देशातील टॉपर असा श्रावणीचा हा थक्क करणारा प्रवास सध्या लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

नकारात्मकतेवर सकारात्मकतेने मात

श्रावणीने तिच्या या यशाचे सर्वात मोठे श्रेय तिच्या सकारात्मक दृष्टिकोनाला दिले आहे. परीक्षा रद्द झाल्यावर निराश होण्याऐवजी, मला अभ्यासासाठी आणखी काही दिवस मिळाले आहेत आणि मी माझा स्कोअर अजून सुधारू शकते, असा विचार तिने केला. परीक्षेच्या तणावाच्या काळात तिने दररोज ध्यान म्हणजेच मेडिटेशनचा आधार घेतला, ज्यामुळे तिचे मन शांत राहिले. जेव्हा कधी अभ्यासाचा जास्त ताण यायचा, तेव्हा ती अभ्यासातून ब्रेक घेऊन आपल्या कुटुंबासोबत गप्पा मारायची किंवा तिच्या शिक्षकांशी बोलून आपला आत्मविश्वास वाढवायची. विचार स्पष्ट असणे आणि सतत सराव करणे हीच या परीक्षेतील यशाची खरी गुरुकिल्ली असल्याचे श्रावणी सांगते.

( नक्की वाचा : NEET 2026 Result: लातूर पॅटर्नची उत्तुंग भरारी; नीट परीक्षेतील घवघवीत यशाने पुसले बदनामीचे सर्व डाग )
 

शिक्षकांचे कुटुंब आणि अभ्यासाची शिस्त

श्रावणीच्या यशाबाबत 'इंडियन एक्स्प्रेस'मध्ये आलेल्या वृत्तानुसार  श्रावणीचे आई आणि वडील दोघेही बारामतीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत. त्यामुळे घरात लहानपणापासूनच शिक्षणाचे आणि स्वयं-अध्ययनाचे म्हणजेच सेल्फ स्टडीचे वातावरण होते. प्राथमिक शाळेत असताना आई-वडिलांनी तिच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष दिले, ज्यामुळे तिला स्वतः अभ्यास करण्याची सवय लागली. 

पुस्तके पाठांतर करण्यापेक्षा त्यातील संकल्पना समजून घेण्यावर श्रावणीचा नेहमीच भर होता. तिची मोठी बहीण सध्या सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून बीएएमएस (BAMS) करत असून, तिच्याकडूनच श्रावणीला वैद्यकीय क्षेत्रात जाण्याची प्रेरणा मिळाली.

( नक्की वाचा : Dombivli News: जिद्दीचा डोंबिवली पॅटर्न! आईच्या निधनानंतरही न खचता सोहननं CA परीक्षेत अख्ख्या देशात कमावलं नाव )

बारामतीतच केली तयारी

NEET सारख्या अवघड परीक्षेच्या तयारीसाठी लाखो विद्यार्थी कोटा किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये जातात, पण श्रावणीने बारामतीमध्येच राहून अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबापासून दूर न जाता तिने स्थानिककोचिंग इन्स्टिट्यूटमधून मार्गदर्शन घेतले. मोठ्या शहरांमधील गर्दीपेक्षा स्थानिक क्लासमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित असल्याने शिक्षकांचे वैयक्तिक लक्ष लाभले, ज्याचा फायदा तिला शंकांचे निरसन करण्यासाठी झाला. श्रावणी रोज क्लासमध्ये 7 तास घालवल्यानंतर घरी येऊन किमान 6 तास स्वतः अभ्यास करायची.

श्रावणीचं मोठं स्वप्न पूर्ण होणार

सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळेल इतका आत्मविश्वास श्रावणीला नक्कीच होता, कारण तिने तशी मेहनत घेतली होती. मात्र, ती देशात मुलींमध्ये पहिली येईल आणि ऑल इंडिया रँक 5 मिळवेल, अशी अपेक्षा तिनेही केली नव्हती. या घवघवीत यशामुळे ती अत्यंत आनंदी असून आता देशातील नामांकित ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजेच 'एम्स' (AIIMS), दिल्ली येथे तिला एमबीबीएस (MBBS) साठी प्रवेश मिळणार हे निश्चित झाले आहे. शेवटच्या क्षणी धावपळ करण्यापेक्षा सुरुवातीपासूनच अभ्यासात सातत्य ठेवणे हाच यशाचा खरा मार्ग असल्याचे तिनं सांगितलं.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com