New Year 2026 Celebration Traffic Jam : ३१ डिसेंबरला अवघा एक दिवस शिल्लक आहे. यादरम्यान मोठ्या संख्येने लोक मुंबई-पुणे, पुणे-मुंबई, मुंबई-कोल्हापूर, मुंबई-नाशिक असा प्रवास करतात. वाहतूक कोंडीमुळे होणारा त्रास टाळण्यासाठी अनेकदा हवाई पर्याय निवडला जातो. मात्र पुढील दोन दिवस हा प्रवास खर्चिक ठरणार आहे. तर कित्येक ठिकाणी थेट फ्लाइट नसल्याने अवघ्या १५० किलोमीटरसाठी ४ ते ५ तासांचा वेळ लागणार आहे. त्यामुळे हवाई वाहतुकीच्या भरोशावर ऐनवेळी निघणार असाल तर आधीच पर्यायी मार्गाचा अवलंब करणं आवश्यक आहे.
गोव्यापेक्षा शिर्डीचं विमानाचं तिकीट महाग...
२९ डिसेंबर रोजी मुंबई ते गोव्याचं विमानाच्या तिकिटाची किंमत ४,८७७ तर एअर इंडियाचं तिकीट ७,०५२ च्या घरात आहे. मात्र शिर्डीला जाण्याचा प्लान करीत असाल तर तुम्हाला याच्या चौपट पैसे भरावे लागू शकतात. मुंबई ते शिर्डी विमानाचं तिकीट १९,०१७ रुपयांपासून सुरू होत आहे. विशेष म्हणजे मुंबईहून थेट शिर्डीला जाणारं विमान उपलब्ध नसून हैद्राबाद किंवा दुसरा एखादा स्टॉप घेऊन साधारण ५ तासांनी तुम्ही शिर्डीला पोहोचाल. २९ डिसेंबरचं दुपारी ३.३० च्या विमानाचं तिकीट २२,११९ रुपयांच्या घरात असून तब्बल साडे सहा तासांनी तुम्ही शिर्डीला पोहोचाल.
रस्त्यांवरील कोंडीमुळे हवाई सेवा महाग?
मुंबई - पुणे एक्सप्रेस, मुंबई नाशिकला जाणाऱ्या रस्त्यांवर प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. नववर्षानिमित्ताने महाबळेश्वरला मोठ्या संख्येने पर्यटक जातात. २८ डिसेंबरला पोलादपूर–महाबळेश्वर रस्त्यावर सध्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. कोकणापासून पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात सध्या असंच काहीसं चित्र आहे. वाहतूक कोंडीत अडकण्याऐवजी पर्यटक हवाई मार्गाचा पर्याय निवडतात.

विमानाच्या तिकिटांच्या किंमती
मुंबई ते गोवा विमानाचं तिकीट - ४,८७७ ते ७,०५२
मुंबई ते दिल्ली विमानाचं तिकीट - ५,७१४ ५,८७६
मुंबई ते बंगळुरू विमानाचं तिकीट - ४,१६०
मुंबई ते कोलकाता विमानाचं तिकीट - ६,१५९
मुंबई ते पुणे एअर इंडिया विमानाचं तिकीट ८,६८१ रुपये असून (६.५० मिनिट) हैद्राबादला एक स्टॉप असेल.

पर्यायी मार्ग कोणते?
मुंबईहून पुणे किंवा नाशिकला जाण्याचा प्लान असेल तर रेल्वे सोईस्कर आहे. रेल्वेचं तिकीट लगेच उपलब्ध होणार नाही, मात्र तत्कालमध्ये तिकीट काढू शकता. किंवा रस्ते मार्गाने जायचं असेल तर सायंकाळनंतर प्रवास करण्यापेक्षा लवकरच प्रवास सुरू करा. सकाळी लवकर प्रवास सुरू केला तर इच्छित स्थळी लवकर पोहोचू शकाल. नाशिक-शिर्डीला जायचं असेल तर समृद्धी महामार्गाचा पर्याय आहे. पुण्याला जाताना मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर कोंडी असेल तर जुन्या मार्गाचा वापर करू शकता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
