जाहिरात

Palghar News : बँक ऑफ बडोदाच्या बाहेर ठेवली मृत म्हैस; शेतकऱ्याच्या आंदोलनाची जिल्ह्यात चर्चा

या अनोख्या आंदोलनामुळे बँकेसमोर मोठी गर्दी जमली, पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले.

Palghar News : बँक ऑफ बडोदाच्या बाहेर ठेवली मृत म्हैस; शेतकऱ्याच्या आंदोलनाची जिल्ह्यात चर्चा

मनोज सातवी, प्रतिनिधी

Palghar News : “विम्याचे पैसे द्या, नाहीतर म्हैस परत घ्या!” असा इशारा देत मोखाडा तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपली मृत म्हैस ट्रॅक्टरमधून आणून थेट बँकेसमोर ठेवल्याने एकच खळबळ उडाली. मोखाडा येथील बँक ऑफ बडोदाच्या  शाखेसमोर टाकपाडा गावातील पशुपालक शेतकरी नवसु दिघा यांनी हे अनोखे आंदोलन केल्याने बँक प्रशासन आणि पोलिसांची तारांबळ उडाली. शेतकऱ्याच्या आक्रमक पवित्र्यामुळे अखेर महिनाभरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा मिळवून देण्याच्या लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन स्थगित केले. मात्र या अनोख्या आंदोलनामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मोखाडा तालुक्यातील टाकपाडा गावातील पशुपालक शेतकरी नवसु दिघा यांनी सन 2022 मध्ये बँक ऑफ बडोदा मोखाडा शाखेतून सुमारे 12 लाखांचे कर्ज घेऊन 10 दूधाळ म्हशी खरेदी केल्या होत्या. या म्हशींवर चोला मंडलम एम. एस. जनरल इन्शुरन्स कंपनीचा विमा घेतला होता. परंतु गेल्या तीन वर्षांत त्यांच्या गोठ्यातील दोन म्हशी मृत्यूमुखी पडल्या असतानाही, विमा कंपनीकडून नुकसानभरपाई आजतागायत मिळालेली नाही.

“माझ्या म्हशींसाठी विमा काढूनही मला नुकसानभरपाई मिळत नाही. बँकेच्या आडमुठेपणामुळे आम्हा शेतकऱ्यांची फसवणूक होते. आता पैसे मिळत नाहीत तर बँकेला म्हैस परत द्यायला आलो आहे, जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत महेश बँकेच्या दारातच ठेवणार” असा इशारा नवसु दिघा यांनी दिला. 

Baramati News : 'दारुचं बिल भर, पैसे दे...' उद्योजगाच्या नाकी नऊ आणणाऱ्या 'बारामतीच्या डॉन'ला घातल्या बेड्या

नक्की वाचा - Baramati News : 'दारुचं बिल भर, पैसे दे...' उद्योजगाच्या नाकी नऊ आणणाऱ्या 'बारामतीच्या डॉन'ला घातल्या बेड्या

या अनोख्या आंदोलनामुळे बँकेसमोर मोठी गर्दी जमली, पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले. यावेळी माजी नगराध्यक्ष अमोल पाटील, माजी जि.प. सदस्य हबीब शेख, वासुदेव खंदारे आदींसह अनेक शेतकऱ्यानी बँकेच्या भोंगळ कारभाराविरोधात आक्रमक पवित्रा घेतला.  दरम्यान, बँक ऑफ बडोदा मोखाडा शाखेचे वरिष्ठ अधिकारी हरिचरण वडला यांनी हस्तक्षेप करत, “एकतीस दिवसांत नवसु दिघा व इतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळवून देऊ,” असे लेखी स्वरूपात आश्वासन दिले आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. या अनोख्या आंदोलनाने  बँक प्रशासनाची मात्र चांगलीच पाचावर धारण बसली. संपूर्ण जिल्ह्यात हे आंदोलन सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com