मनोज सातवी, प्रतिनिधी
Palghar News : पालघर तालुक्यातील कांद्रेभुरे या जिल्हा परिषदेच्या एका शाळेत शिक्षक उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी थेट शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनाला घेराव घातला. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत एकूण ४२ विद्यार्थी पटसंख्या असलेल्या या शाळेत केवळ एकच कंत्राटी शिक्षक नेमणूक करण्यात आली आहे. मात्र संबंधित शिक्षक वेळेवर शाळेत उपस्थित राहत नसल्याची गंभीर तक्रार पालकांकडून करण्यात आली आहे.
शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे शाळेतील विद्यार्थी पटसंख्येत मोठी घट झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. आयएसओ मान्यता प्राप्त असलेली ही शाळा शिक्षकांच्या अभावामुळे बंद होण्याच्या मार्गावर असल्याने पालकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, पालघर तालुक्यासाठी दहा शिक्षक उपलब्ध झाले असून विद्यार्थी पटसंख्येनुसार अतिरिक्त शिक्षकांची नेमणूक करण्याचे आश्वासन जिल्हा शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर यांनी दिले. त्यानंतर घेराव आंदोलन मागे घेण्यात आले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
