संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी
Pandharpur News : गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हणजे तुफान गर्दी आणि त्यातून उडालेला गोंधळ. अनेक वेळा हे असंच चित्र पाहायला मिळालं. त्यातून गौतमीच्या नृत्यावर आक्षेपही घेण्यात आला. आता नृत्यांगना राधा पाटीलच्या कार्यक्रमातही राडा झाला आहे. पंढरपूरच्या सुस्ते गावात राधा पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेव्हा नेमकं काय घडलंय, जाणून घ्या.
राधा पाटीलच्या कार्यक्रमाला गालबोट...
आपल्या अदांनी एकाच वेळी हजारो चाहत्यांना घायाळ करणारी ही राधा पाटील. नृत्यांगना, रीलस्टार आणि बिग बॉस फेम राधा पाटील. लावणी आणि नृत्यात गौतमी पाटीलला टफ देणारी ही राधा पाटील. गेल्या काही वर्षात तरुणांमध्ये राधा पाटीलची क्रेझ वाढत असल्याचं दिसून येत आहे. गौतमी आणि राधाची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडते. पण पंढरपुरात राधा पाटीलच्या कार्यक्रमाला गालबोट लागलंय. सध्या गावखेड्यात यात्रा आणि जत्रांचा माहोल सुरु आहे. पंढरपुरातल्या सुस्ते गावात राधा पाटीलच्या डान्सचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. कार्यक्रम चांगलाच रंगात आला होता. राधाच्या अदांनी चाहते घायाळ झाले होते. तिच्या प्रत्येक ठेक्यावर चाहतेही धुंद होऊन नाचत होते. पण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात दोन तरुणांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत होऊन मोठा राडा झाला. पोलिसांनी तत्काळ कार्यक्रम थांबवला आणि गर्दीला शांत केलं.
महत्वाची बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वी याच जागी गौतमी पाटीलचाही कार्यक्रम पार पडला होता. तेव्हाही मोठी गर्दी झाली होती. पण कुठल्याही राड्याशिवाय शांततेत कार्यक्रम पार पडला. सुस्ते गावात दोन राजकीय पार्टी आहेत. एका गटाकडून गौतमीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तर दुसऱ्या गटानं राधाचा कार्यक्रम ठेवला. दरम्यान, या वादाला कोणताही राजकीय रंग नसला तरी झालेल्या राड्याची चर्चा मात्र जोरात सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world