संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या जतन संवर्धनाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र या जतन संवर्धनाच्या कामामुळे एक खजिना हाती लागला आहे. विष्णूच्या दोन मूर्ती, महिषासूरमर्दिनीची पादुका आणि देवीच्या दोन लहान मूर्ती तळघरात सापडल्या आहेत. याशिवाय तळघरात बांगड्यांचे काही तुकडेही सापडले आहेत. बांगड्यांच्या या तुकड्यांमुळे खजिन्याचे गूढ आणखीनच वाढले आहे. मंदिरामध्ये अनेक तळघरे तसेच भुयारी मार्ग असल्याचे संदर्भ अनेकदा ऐकिवात आले होते. ३१ मे रोजी सापडलेल्या तळघरामुळे मंदिरात आणखीही काही तळघरे असण्याची शक्यता बळावली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कसं सापडलं तळघर?
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये जतन संवर्धनाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. सध्या फरशी बसविण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना एक फरशी तळघरात पडली होती. फरशी पडल्याने हे तळघर दिसून आलं. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ बोलावण्यात आलं. या अधिकाऱ्यांनी आतमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. आतमध्ये उतरल्यानंतर हे तळघर 8 फूट रुंद आणि 8 फूट उंच असल्याचे दिसून आले. तळघरामध्यये विष्णूच्या दोन मूर्ती सापडल्या आहेत. यातील एक मूर्ती पंढरपुरातील विठ्ठल मंदिराप्रमाणेच प्राचीन मंदिरांपैकी एक असलेल्या विष्णू मंदिरातील मूर्तीशी साधर्म्य असलेली आहे. ही मूर्ती व्यंकटेश स्वरुपातील आहे. दुसरी मूर्ती मात्र पूर्णपणे वेगळी असून पंढरपुरातील मंदिर परिवारातील मूर्तींपेक्षा ती वेगळी आहे. विष्णूच्या दोन्ही मूर्ती या साडेचार फूट उंचीच्या आहेत.
विष्णूच्या मूर्तींव्यतिरिक्त या तळघरातून महिषासूरमर्दिनीची अडीच फुटाची मूर्ती, देवीच्या दोन लहा मूर्ती आणि पादुका सापडल्या आहेत. लहान आकाराच्या मूर्ती कोणत्या देवीच्या मूर्ती आहे याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. तळघरामध्ये 5-10 पैशांची नाणीही सापडलेली आहे. या तळघरामध्ये बांगड्यांचे तुकडेही सापडल्याने त्या बांगड्या कोणाच्या आहेत याबाबतचे गूढ वाढले आहे. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांच्याशी बोलताना या मूर्ती 1560, 1570 सालच्या म्हणजेच सोळाव्या शतकातील असाव्यात असा अंदाज वर्तवला आहे. बारकाईने तपासणी केल्यानंतर या मूर्ती किती जुन्या आहेत हे कळू शकेल.
( नक्की वाचा : 700 वर्षांपूर्वी असं दिसत होतं पंढरपूरचं मंदिर! पाहा फर्स्ट लुक )
मूर्ती तळघरात का ठेवल्या ?
ज्या तळघरात या मूर्ती सापडल्या आहेत ते तळघर कुलूप घालून बंद करण्यात आलं होतं. या तळघराला येण्याजाण्याचा दुसरा कोणताही मार्ग नव्हता. फरशी मोकळ्या जागेतून खाली पडल्याने हे तळघर दिसून आले. मूर्तींचा भंग होऊ नये यासाठी या मूर्ती इथे दडवून ठेवल्या होत्या का अन्य काही कारणासाठी इथे ठेवल्या होत्या हे कळू शकलेलं नाही. या मूर्ती कुठे ठेवायच्या याबाबत पुरातत्व विभाग आणि मंदिर व्यवस्थापनाची बैठक होणार आहे. त्या बैठकीत मूर्ती कुठे ठेवायच्या याचा निर्णय घेतला जाईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world