जाहिरात

Pandharpur Wari 2025 : पंढरपुरात वारकऱ्यांसाठी तयार होत आहेत 13 लाख 50 हजार बुंदीचे लाडू, कशी सुरु आहे तयारी?

Pandharpur Wari 2025 : आषाढी एकादशीच्या सोहळ्यानंतर विठ्ठलाचा गोड प्रसाद आपल्या घरी घेऊन जावा. अशी प्रत्येकाचीच इच्छा असते.

Pandharpur Wari 2025 : पंढरपुरात वारकऱ्यांसाठी तयार होत आहेत 13 लाख 50 हजार बुंदीचे लाडू, कशी सुरु आहे तयारी?
पंढरपूर:

संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी

Pandharpur Wari 2025 : आषाढी एकादशीच्या सोहळ्यानंतर विठ्ठलाचा गोड प्रसाद आपल्या घरी घेऊन जावा. अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. याकरिताच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती अर्थात देवस्थानचा प्रसादाचा बुंदीचा लाडू मोठ्या प्रमाणावर तयार होत आहे. तब्बल 13 लाख 50 हजार इतके बुंदी लाडू तयार होत आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

आषाढ शुध्द एकादशीला म्हणजे दिनांक 6 जुलै रोजी आषाढी यात्रा संपन्न होत आहे. या यात्रेचा कालावधी सुरू झाला असून, भाविकांची दर्शन रांगेत व मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून मंदिर समिती मार्फत पुरेशा प्रमाणात बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती  मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

कसा आहे प्रसाद?

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक दर्शन झाल्यानंतर श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद खरेदी करत असतो. मंदिर समितीच्या बुंदी लाडू प्रसादाला भाविकांतून मोठी मागणी होत असते. या प्रत्येक भाविकांना लाडू प्रसाद मिळेल या दृष्टीने 13 लक्ष 50 हजार बुंदी लाडू प्रसाद व 60 हजार राजगिरा लाडू प्रसादाची उपलब्धी ठेवण्यात येत आहे. यामध्ये बुंदी लाडू प्रसाद मंदिर समितीमार्फत व राजगिरा लाडू प्रसाद आऊटसोर्सिंग पद्धतीने खरेदी करण्यात येत आहे. 

( नक्की वाचा : Pandharpur Ashadhi Wari 2025 : पंढरपुरात राहण्याची सोय कुठे आहे? खर्च किती आणि कसे कराल बुकींग? )

70 ग्रॅम वजनाचे दोन बुंदी लाडू कागदी पिशवीत पॅकिंग करून प्रति पाकीट 20 रुपये प्रमाणे व 25 ग्रॅम वजनाचे दोन राजगिरा लाडू पॅकिंग करून प्रति पाकीट 10 रुपये प्रमाणे भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी पश्चिम द्वार, उत्तर द्वार, श्री संत तुकाराम भवन असे एकूण तीन स्टॉल असून, सर्व स्टॉल 24 तास खुले ठेवण्यात येत आहेत. बुंदी लाडू प्रसाद एमटीडीसी भक्तनिवास येथील लाडू उत्पादन केंद्रामध्ये हरभरा डाळ, साखर, शेंगदाणा डबल रिफाइंड तेल, काजू, बेदाणा, विलायची इत्यादी पदार्था पासून तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून तयार करण्यात येत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

बुंदी लाडूप्रसादासाठी आवश्यक कच्चा माल म्हणजे सुमारे 25000 किलो हरभरा दाळ, 37500 किलो साखर, 17000 किलो शेंगदाणा तेल, 500 किलो काजू, 375 किलो बेदाणा, 37 किलो विलायची, 2500 ग्रॅम केशरी रंगाची खरेदी करण्यात आली आहे. या लाडू प्रसादाची शासकीय प्रयोगशाळेतून खाण्यास योग्य असल्याबाबत तपासणी करून घेण्यात आली आहे.

 बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद व्यवस्थेची जबाबदारी अनुभवी विभाग प्रमुख भिमाशंकर सारवाडकर यांना देण्यात आली आहे, याशिवाय सुमारे 120 कर्मचारी 24 तास परिश्रम घेत आहेत. भाविकांना दिला जाणारा लाडू प्रसाद स्वादिष्ट करतांना आरोग्याच्या दृष्टीनेही सर्व नियम पाळण्यात येत आहेत. प्रसाद पॅकिंग करण्यासाठी पर्यावरण पूरक कागदी पिशवीचा वापर करण्यात येत असल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगीतले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com