शिरपूर तालुक्यातील (Dhule News) ताजपुरी येथे एका 20 वर्षीय बी. फार्मसीच्या विद्यार्थ्याने (B. Pharmacy student) आपला मोबाईल हॅक करून फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या भीतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बंटी उर्फ किशन जितेंद्र सनेर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
शिरपूर तालुक्यातील थाळनेरजवळ असलेल्या ताजपूरी गावातील सनेर कुटुंबातील एकुलता एक मुलाने धक्कादायक पाऊल उतललं आहे. किशनने राहत्या घरात साडीच्या साह्याने गळफास घेतला. कुटुंबियांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने मृत किशनचा मोबाइल हॅक करून काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. ही बाब किशनच्या लक्षात आल्यानंतर तो नैराश्यात गेला आणि त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले, असे बोलले जात आहे.
नक्की वाचा - Juvenile Detention Centre : छत्रपती संभाजीनगरमधील बालसुधारगृहातून का गायब होत आहेत मुली? धक्कादायक कारण आलं समोर
या घटनेची थाळनेर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी शत्रुघ्न पाटील यांनी सांगितले की, मोबाइल हॅकची माहिती समोर आली असून त्या दिशेने चौकशी सुरू आहे. यासाठी किशनचे काही निकटवर्तीय आणि मित्रांकडे विचारपूस करण्यात येणार असून, त्याचा मोबाइल देखील तपासला जाऊ शकतो. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.