सुरज कसबे, पिंपरी-चिंचवड
Pimpri Chinchwad News: सध्या अधिकमास सुरू आहे आणि या अधिकमासात जावयाचा मोठा मान असतो. प्रत्येक सासरा आपल्या जावयाला सोन्याच्या स्वरूपात काहीतरी वस्तू देत असतो. मात्र पिंपरी चिंचवडमध्ये अनोखा धोंडा उत्सव पाहायला मिळाला. अधिक मासानिमित्त पिंपरी-चिंचवडच्या बारणे कुटुंबीयांकडून सून आणि मुलीला लाखो रुपयांच्या चांदीच्या चपला भेट देण्यात आल्या.
सून आणि मुलीला चांदीच्या चपला
याबाबत सविस्तर माहिती अशी की, हिंदू धर्मातील परंपरेनुसार तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात मुलीला चांदीचे पैजण किंवा जोडवे देण्याची प्रथा आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडच्या संतोष नगर येथील बारणे कुटुंबीयांनी या प्रथेला अनोखा फाटा दिला आहे. त्यांनी आपल्या लाडक्या सून आणि मुलीला प्रत्येकी लाखो रुपये किमतीच्या चांदीच्या भरीव चपला भेट दिल्या आहेत.
यासाठी त्यांनी कोकणे चौकातील रांका ज्वेलर्सकडून विशेष ऑर्डर देऊन चांदीच्या तीन जोड्या तयार करून घेतल्या असून, या अनोख्या आणि मौल्यवान भेटीची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.
या कौतुकास्पद उपक्रमाबाबत बोलताना, आमची मुलगी जशी लक्ष्मी आहे, तशीच सूनही आमच्यासाठी साक्षात लक्ष्मी स्वरूपच आहे, अशी भावूक भावना बारणे कुटुंबीयांनी व्यक्त केली. अधिक मासाचे औचित्य साधून सून आणि मुलीमध्ये कोणताही भेदभाव न करता दोघांनाही समान आनंदाचा ठेवा देण्याच्या उद्देशानेच या चांदीच्या चपला भेट दिल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. सून आणि मुलीला एकाच मापाने सन्मानित करणाऱ्या बारणे कुटुंबीयांच्या या आदर्श निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Hingoli News: संतापजनक! 5 दिवसांचे अर्भक झुडपात फेकलं, निर्दयी माता- पित्याचा शोध सुरु
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world