सूरज कसबे
आर्थिक विवंचनेला कंटाळून संपूर्ण कुटुंबाने टोकाचे पाऊल उचलले आहे. पिंपरी येथील करिष्मा ग्लोरी सोसायटीत राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांनी हे कृत्य केले. त्यांनी विषारी औषधाचा धूर घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याघटनेनंतर सोसायटीमध्ये एकच खळबळ उडाली. या घटनेत 50 वर्षीय विनोद पिल्ले यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. तर उपचार सुरू असतानाच विनोद यांची पत्नी सिरजा आणि 19 वर्षाची मुलगी पौर्णिमा यांचा ही मृत्यू झाला आहे. हे कुटुंब अत्यंत उच्चशिक्षित होते. तरी ही त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विनोद पिल्ले हे आपल्या कुटुंबासह पिंपरीच्या करिष्मा ग्लोरी या सोसायटीमध्ये राहत होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सिरजा पिल्ले वय वर्ष 45 आणि मुलगी पौर्णिमा वय वर्ष 19 हे राहत होते. विनोद यांनी आयआयएम अहमदाबाद येथून संगणक शास्त्राचे शिक्षण घेतले होते. तर सिरजा या एका नामांकित शाळेत समन्वयक म्हणून कार्यरत होत्या. त्या कामावर गैरहजर राहिल्यामुळे सिरजा यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या नातेवाईकांना ही माहिती दिली. त्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. घटनास्थळी संत तुकाराम नगर पोलिसांना एक सुसाईड नोट आणि विषारी औषधाचा डबा सापडला आहे.
या सुसाईट नोटमध्ये काही गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहे. त्याच लिहीलं आहे की आर्थिक विवंचनेतून आपण हे टोकाचे पाऊल उचलत आहे. या घटनेसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे विनोद पिल्ले यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. विनोद यांनी 1 जून रोजी एक रासायनीक द्रव्य ऑनलाइन मागवले होते. त्यांनी हे द्रव्य कोळशावर जाळून त्याचा धूर सर्वत्र पसरवला. त्यात घरात असलेल्या सर्वांचा गुदमरून मृत्यू झाला. पिल्ले कुटुंबावर मोठे कर्ज होते. हे कर्ज कसे फेडायचे असा विचार हे कुटुंब करत होते.
त्यातून त्यांनी तीन वर्षांपूर्वी आपले नेहरूनगर येथील स्वतःचे घर विकले होते. त्यानंतर ते सध्या मोरवाडी येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. या हृदयद्रावक प्रकरणाचा संत तुकाराम नगर पोलीस अधिक तपास करत आहेत. जेव्हा ही घटना समोर आली त्यावेळी तिघे ही घरात पडले होते. त्यात विनोद यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर पत्नी आणि मुलगी जिवंत होते. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. पण त्याच वेळी त्यांचा ही मृत्यू झाला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस अजून करत आहेत. ही आत्महत्याच आहे की या मागे आणखी काही कारणे आहेत याचा शोध घेतला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world