जाहिरात

जंतर-मंतर विद्यार्थी लाठीहल्ल्याप्रकरणी प्रहार संघटना आक्रमक! सुरेखा ढवळे यांचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा

CJP jantar mantar protest: दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रहार संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

जंतर-मंतर विद्यार्थी लाठीहल्ल्याप्रकरणी प्रहार संघटना आक्रमक!  सुरेखा ढवळे यांचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा

यशपाल सोनकांबळे, पुणे

दिल्ली येथील जंतर-मंतरवर आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सरकारने चर्चा करण्याऐवजी केलेल्या लाठीचार्जचे पडसाद आता महाराष्ट्रात तीव्रतेने उमटू लागले आहेत. या निर्दयी लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रहार संघटनेने राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूर येथे श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करू दिली जाणार नाही, असा थेट इशारा प्रहास संघटनेने दिला आहे. प्रहार संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुरेखा ढवळे सरकारवर जोरदार निशाणा साधला.

"मुख्यमंत्र्यांना महापूजेचा अधिकार नाही"

दिल्लीतील आंदोलनाचा आणि सरकारच्या भूमिकेचा जाहीर निषेध करताना सुरेखा ढवळे म्हणाल्या,  "दिल्लीमध्ये आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या मुलाबाळांवर अमानुष लाठीचार्ज केला जात आहे. महाराष्ट्रातील शिक्षण खात्यात आणि देशात विद्यार्थ्यांचे रक्त सांडले जात असताना, दुसरीकडे महापूजा करून जनतेसाठी आशीर्वाद मागण्याची नौटंकी आता बंद झाली पाहिजे. जर आमच्या मुलांवर लाठ्या चालवल्या जात असतील, तर अशा मुख्यमंत्र्यांना पंढरपूरमध्ये विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरत नाही."

(नक्की वाचा- Ketan Agrawal Case: केतनचा जीव वाचला असता; सिया आणि चेतनने पोलिसांना सांगितला 'प्लॅन A')

"विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय समजण्याची चूक करू नका"

महाराष्ट्र ही साधू-संतांची भूमी असून सध्या आषाढी वारीसाठी सर्व दिंड्या पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना ढवळे यांनी इशारा दिला की, मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला केवळ राजकीय आंदोलन समजण्याची चूक करू नये. सत्ताधारी पक्षातील आमदार आणि खासदार आंदोलक विद्यार्थ्यांबद्दल बेताल वक्तव्ये करून तोंडसुख घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

(नक्की वाचा-  Ashadhi Wari 2026: आषाढी वारीसाठी पुणे एसटी विभागाची मोठी घोषणा! 350 हून अधिक विशेष बसगाड्या सोडणार)

शिक्षण व्यवस्थेतील गोंधळ आणि दिल्लीतील लाठीचार्जचा निषेध म्हणून प्रहार संघटना पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या महापूजेला तीव्र विरोध करेल, असे ढवळे यांनी स्पष्ट केल्यामुळे आषाढी वारीच्या तोंडावर पंढरपूरमध्ये प्रशासनाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com