योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देशाच्या भवितव्याबाबत अत्यंत गंभीर इशारा दिला आहे. 'सध्या सुरू असलेल्या निवडणुकांपेक्षा देशावर आलेलं मोठं संकट अधिक महत्त्वाचं आहे,' असं सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'अहंकारा'मुळे भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध ताणले गेल्याचा आरोप केला आहे. अकोल्यातील बार्शीटाकळी येथे झालेल्या जाहीर संवाद बैठकीनंतर बोलताना त्यांनी येत्या 3 महिन्यांत भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होण्याची शक्यता वर्तवली असून, युद्ध झाल्यास त्याचे गंभीर परिणाम देशाला भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. त्यांनी या परिस्थितीत मीडिया आणि नागरिकांना जबाबदारीने वागण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
प्रकाश आंबेडकर हे अकोला दौऱ्यावर असताना, बार्शीटाकळी येथे कार्यकर्ता जाहीर संवाद बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. देशात सध्या निवडणुकीचे सत्र सुरू असले तरी, त्यांनी याकडे दुर्लक्ष करत एक गंभीर मत मांडले. ते म्हणाले, "निवडणुका बाजूला ठेवा, सध्या भारतावर मोठं संकट आलं आहे." देशाच्या भवितव्यावर सध्या गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रसारमाध्यमांनी या परिस्थितीत अधिक जबाबदारीने आणि खबरदारी घेऊन वागण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
( नक्की वाचा : Akola News: पीक विम्यात शेतकऱ्यांची क्रूर थट्टा; अकोल्यात खात्यात जमा झाले फक्त 3, 5, आणि 21 रुपये 85 पैसे! )
भारत-पाक युद्धात 3 महिन्यांत होण्याची शक्यता?
अकोल्याचे माजी खासदार असलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या मते, येत्या 3 महिन्यांत भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होण्याची दाट शक्यता आहे. "आर्मी प्रमुखांनीही पत्रकार परिषदेत अशा स्वरूपाचे संकेत दिले आहेत," असे त्यांनी नमूद केले. हे भाकीत खरे ठरू नये, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणावर आणि सध्याच्या राजकीय नेतृत्वावर जोरदार टीका केली.
'मोदींचा अहंकार' आंतरराष्ट्रीय संबंधांना बाधक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ॲड. आंबेडकर म्हणाले की, "आज भारताच्या विरोधात जगातील अनेक देश उभे राहिले आहेत. हे भारताच्या नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अहंकाराचे फलित आहे." स्वतःला 'विश्वगुरू' समजणं आणि इतर देशांचा अपमान करणं, यामुळे अनेक राष्ट्रं भारतावर नव्हे, तर केवळ मोदींवर नाराज असल्याचा आरोप त्यांनी केला. या स्थितीमुळे मुस्लीम राष्ट्रांचा पाठिंबादेखील पाकिस्तानला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
युद्ध झाल्यास मोठे संकट
युद्ध झाल्यास निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याबाबत त्यांनी गंभीर इशारा दिला. "युद्ध झालं आणि आपण हरलो, तर पाकिस्तानचा प्रभाव भारतावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही," असे ते म्हणाले. त्यांनी 1971 च्या युद्धाचा संदर्भ दिला. त्या वेळी भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते, पण आज परिस्थिती पूर्णपणे उलट असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आज पाकिस्तानला मदत करणाऱ्या देशांची संख्या वाढत असल्यामुळे भारताचे स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकते, अशी भीती त्यांनी वर्तवली.
मीडिया आणि नागरिकांनी सावध राहावे:
देशात सध्या जी परिस्थिती आहे, ती मीडिया आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीही धोकादायक ठरू शकते, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारकडे कोणती तयारी आहे, हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या कुटुंबाच्या सुरक्षेबाबत जागरूक राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world