दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या रामा हॉटेलबाहेर भाजप आणि ठाकरे गटात राडा झाला होता. इथली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. या प्रकरणात पोलिसांनी भाजप आणि शिवसेना उबाठाच्या कार्यकर्त्यांविरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केलेत. धक्कादायक बाब ही आहे की हे गुन्हे फक्त सामान्य आंदोलकांवर करण्यात आले असून ज्यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते त्यांची नावे मात्र एफआयआरमध्ये समाविष्ट करण्यात आलेली नाहीत.
हे ही वाचा: खैरे विरूद्ध दानवे? संभाजीनगरात सेनेची दोन आंदोलने का?
25 ऑगस्ट रोजी शिवसेना उबाठाच्या अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर विमानतळ परिसरात आंदोलन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगावला जात असताना या विमानतळावर थांबले होते. बदलापूर प्रकरणी पंतप्रधानांनी उत्तर द्यावे अशी मागणी करत दानवे आणि कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले होते. या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी भाजपने हॉटेल रामाबाहेर आंदोलन केले होते. छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांच्याविरोधात 26 ऑगस्ट रोजी भाजपने आंदोलन केले होते. आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन प्रकरणी उत्तर द्यावे अशी मागणी करत हे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाच्यावेळी शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते.
हे ही वाचा : अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात काय चाललंय? भाजपाची मंत्र्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडं धाव
भाजपकडून या आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री भागवत कराडांचा मुलगा हर्षवर्धन कराड आणि भागवत कराडांची बहीण उज्ज्वला डोहीफोडे यांनी केले होते. तर त्यांना उत्तर देण्यासाठी शिवसेना उबाठातर्फे करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेतृत्व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा भाऊ राजू दानवे आणि मुलगा धर्मराज दानवे यांनी केले होते. यावेळी हॉटेल रामाबाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या आंदोलनाप्रकरणी सिडको पोलिसांनी भाजपच्या 32 आणि ठाकरे गटाच्या 28 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. आश्चर्याची बाब ही आहे की पोलिसांनी ना कराडांच्या मुलाविरोधात आणि बहिणीविरोधात गुन्हा दाखल केला ना अंबादास दानवेंच्या मुलाविरोधात आणि भावाविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हे हे दोन्ही पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांविरोधात दाखल करण्यात आले असून त्यांच्याविरोधात दंगल माजवल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ज्यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल का करण्यात आले नाही याचे मोठे कोडे पडलेले आहे.