रेवती हिंगवे, पुणे:
Fursungi Urali Devachi Election News: राजकारण म्हटलं की वाद- विवाद अन् संघर्ष आलाच. राजकारणासाठी कुटुंबांमध्ये उभी फूट पडल्याच्या, गावागावात, भावाभावात राजकारणामुळे पिढ्यानपिढ्यांचा छत्तीसचा आकडा पाहायला मिळतो. आपल्या नेत्यांसाठी, पक्षासाठी मैत्री, रक्ताची नातीही अनेकांना नकोशी वाटतात. एकीकडे राजकारणाने असे मनामनात अंतर वाढत असतानाच पुण्यातील तीन तरुणांनी मैत्री अन् राजकारण कसं जपावं? याचा नवा आदर्श घालून दिला आहे, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
3 मित्र, तीन पक्ष, एक प्रभाग..
राज्यात आज पुन्हा एकदा नगरपरिषद, नगरपंचायतींच्या मतदानाचा धुरळा उडणार आहे. बारामती, अंबरनाथ, फलटणसह राज्यातील 23 नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये आज मतदान होत आहे. निवडणुकांच्या या रणधुमाळीत फुरसुंगी उरळी देवाची या नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरलेल्या तीन उमेदवारांनी सर्वांचेच लक्ष वेधले आहे, याचे कारण आहे त्यांची मैत्री....
फुरसुंगी उरळी देवाच्या नगरपालिका निवडणुकीत एक प्रभाग, एक जागा आणि एकाच वर्गातील तीन मित्र वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे. दोस्तीत कुस्ती नाय म्हणत हे तिन्ही मित्र आपली मैत्री जपत राजकारणाच्या रिंगणात उतरले आहेत. भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विराज करजे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून गिरीष ढोरे, आणि उद्भव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून प्रकाश भारती असे हे तीन मित्र निवडणूक लढवत आहेत.
राजकारणापलिकडील मैत्रीची राज्यात चर्चा
महत्त्वाचं म्हणजे हे तिन्ही मित्र उच्चशिक्षित आहेत. या तिघांपैकी आहे एक वकिल आहे, दुसरा इंजिनिअर आणि एक जण उद्योजक आहे. तिघेही फुरसुंगी उरळी देवाची नगरपालिकेच्या प्रभाग १ मधून उमेदवार आहेत. एकमेकांच्या विरोधात ठाकलेल्या या कट्टर मित्रांचा एक फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. थोडक्यात, मैत्रीत कधी राजकारण करायचे नसते, मित्रांनी मिळून राजकारण करायचे असते हाच नवा संदेश या तिन मित्रांनी दिला आहे. त्यांची ही राजकारणापलिकडील मैत्री अशीच टिकून राहावी, याच सदिच्छा..
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world