जाहिरात

Washim News: वाशिममध्ये भाजप उमेदवाराची 'दादागिरी', ठाकरे गटाच्या उमेदवाराला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी

Washim News: वाशिम नगरपालिका निवडणुकीत प्रभागातील प्रचाराची रणनिती सुरू असताना, लाखाळा परिसरात रात्रीच्या वेळी दोन्ही पक्षांचे उमेदवार आणि त्यांचे समर्थक समोरासमोर आले.

Washim News: वाशिममध्ये भाजप उमेदवाराची 'दादागिरी', ठाकरे गटाच्या उमेदवाराला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी

साजन ढाबे, वाशिम

वाशिम नगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागताच राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. मात्र, या निवडणुकीला आता हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. वाशिममधील लाखाळा परिसरात मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट) या दोन्ही पक्षांचे गट समोरासमोर आले. यावेळी झालेल्या वादात भाजप उमेदवाराने शिवसेनेच्या उमेदवाराला बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नेमकी घटना काय?

वाशिम नगरपालिका निवडणुकीत प्रभागातील प्रचाराची रणनिती सुरू असताना, लाखाळा परिसरात रात्रीच्या वेळी दोन्ही पक्षांचे उमेदवार आणि त्यांचे समर्थक समोरासमोर आले. शाब्दिक चकमकीचे रूपांतर लवकरच धक्काबुक्कीत झाले. शिवसेनेचे (UBT) उमेदवार गुड्डू उर्फ प्रवीण इढोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भाजपचे उमेदवार सतीश उर्फ गल्ला वानखडे यांनी त्यांना मारहाण केली आणि गंभीर परिणाम भोगण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

पोलीस कारवाई आणि आरोपी फरार

घटनेची माहिती मिळताच वाशिम शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रवीण इढोळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सतीश वानखडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, गुन्हा दाखल होताच आरोपी सतीश वानखडे हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या राड्यामुळे लाखाळा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मतदारांना भीतीमुक्त मतदानाचे आवाहन

वाशिम शहर पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंग ठाकूर यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, "निवडणुकीच्या काळात कोणत्याही प्रकारची गुंडगिरी सहन केली जाणार नाही. मतदारांनी कोणत्याही दहशतीला किंवा आमिषाला बळी पडू नये. जर कोणी धमकावण्याचा प्रयत्न केला, तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. आम्ही शांततेत निवडणूक पार पाडण्यासाठी कटिबद्ध आहोत."

राजकीय आरोप-प्रत्यारोप

या घटनेनंतर वाशिममध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शिवसेनेने भाजपवर सत्तेचा आणि दहशतीचा वापर केल्याचा आरोप केला आहे, तर भाजपकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. निवडणुकीच्या मतदानापूर्वीच अशा प्रकारे संघर्ष होत असल्याने सामान्य मतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com