
पुणे: पुणे शहरातील जुन्या भागात गणेशोत्सवादरम्यान दारूची दुकाने, परमिट रूम, बीअर बार आणि रेस्टॉरंट्स बंद ठेवण्याचा आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे. गणेश मंडळांची संख्या जास्त असलेल्या विश्रामबाग, फरासखाना आणि खडक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही बंदी लागू करण्यात आली आहे. यापूर्वी ही बंदी केवळ गणेशोत्सवाच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी मर्यादित होती. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे संपूर्ण उत्सवासाठी 'ड्राय डे' घोषित करण्याची विनंती केली होती.
Pune Ganoshotsav: गणेश भक्तांसाठी सुरक्षा कवच! दगडूशेठ गणेश मंडळाकडून 50 कोटींचा विमा
दुसरीकडे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गणेशोत्सवासाठी लाऊडस्पीकरला मध्यरात्रीपर्यंत परवानगी देण्याचा अंतिम आदेश शनिवारी जारी केला. दि 30 ऑगस्ट ते दि 4 सप्टेंबर या कालावधीसाठी आणि विसर्जन दिनांकासाठी (दि 6 सप्टेंबर) ही सूट लागू असेल. ही मुदत एकूण 7 दिवसांची आहे. गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे हा निर्णय मंडळांशी चर्चा करून घेण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाऊडस्पीकरला सहसा 5 दिवसांसाठी रात्री 12 पर्यंत परवानगी दिली जाते. यंदा ती 7 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे, कारण उत्सवाचे चौथे आणि पाचवे दिवस शनिवार-रविवारला येत आहेत. या काळात मोठी गर्दी अपेक्षित असल्याने हा निर्णय घेण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही पुण्यात आढावा घेत असताना या निर्णयाची घोषणा केली होती.
केंद्र सरकारने ध्वनिप्रदूषण नियमांनुसार (2000 आणि 2017 मध्ये सुधारित), वर्षातून 15 दिवसांसाठी मध्यरात्रीपर्यंत लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी दिली आहे, ज्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालयांसारख्या शांतता क्षेत्रांमध्ये ही सूट लागू नसेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world