रेवती हिंगवे, पुणे:
Pune Mahanagarpalika Election 2026: आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराच्या राजकारणात एक मोठी आणि अत्यंत महत्त्वाची घडामोड घडली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी राहिलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आगामी महापालिका निवडणूक एकत्रित लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
पुण्यात मनसे- ठाकरे सेनेचं ठरलं!
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये जागावाटपाचा तिढा सुटला असून, ९१-७४ असा फॉर्म्युला ठरवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या नव्या समीकरणानुसार, शिवसेना ठाकरे गट ९१ जागांवर तर मनसे ७४ जागांवर नशीब आजमावणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या सत्तेची गणिते बदलण्यासाठी ही 'ठाकरे' बंधूंची युती निर्णायक ठरू शकते.
Pune Election 2026: पुण्यात महायुतीच्या जागावाटपाचा वाद! शिंदे गटाकडून स्वबळाची तयारी?
मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी या चर्चेला दुजोरा दिला असून, दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ पातळीवर सकारात्मक चर्चा झाल्याचे स्पष्ट केले आहे.
पुण्यातील प्रस्थापित राजकीय बलाबल पाहता, ही युती सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे करू शकते. गेल्या काही निवडणुकांमध्ये मनसे आणि शिवसेनेची मते विभागली गेल्याचा फायदा अन्य पक्षांना झाला होता.
राज ठाकरे- उद्धव ठाकरे घेणार अंतिम निर्णय
हे टाळण्यासाठीच हा समझोता झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. आता केवळ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या अधिकृत मोहोर उमटण्याची प्रतीक्षा असून, येत्या दोन दिवसांत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. पुण्यातील ठाकरे बंधुंची ही युती निवडणुकांवर काय परिणाम करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world