रेवती हिंगवे आणि सूरज कसबे,पुणे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 'जिजाई' या निवासस्थानी खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार यांनी त्यांची गुरुवारी रात्री उशीरा भेट घेतली. तब्बल तासभर चाललेल्या या चर्चेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक दोन्ही राष्ट्रवादींनी 'एकत्र' लढण्यावर प्राथमिक सहमती झाल्याचे समजते.
बैठकीत काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत अत्यंत गोपनीय पद्धतीने चर्चा झाली. पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही गट स्वतंत्र लढण्याऐवजी एकत्र आले तर भाजपसमोर मोठे आव्हान उभे करता येईल, यावर तिन्ही नेत्यांचे एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे. निवडणूक एकत्र लढायची असेल तर जागावाटप हा सर्वात मोठा मुद्दा आहे. त्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली असून येत्या 2 दिवसांत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. चर्चेदरम्यान अजित पवारांनी स्वतः शरद पवार गटाच्या काही स्थानिक नेत्यांशी फोनवर संपर्क साधला आणि एकत्रित लढण्याचे फायदे समजावून सांगितले.
(नक्की वाचा- Santosh Deshmukh Case: "मला बोलायचंय", कोर्टाने दोनच शब्दात वाल्मीक कराडचं तोंड केलं बंद, सुनावणीत काय घडलं?)
रोहित पवार आणि अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना नेत्यांनी सावध पवित्रा घेतला. अमोल कोल्हे यांनी म्हटलं की, आम्ही फक्त प्राथमिक चर्चा केली आहे. आताच कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नका. फक्त 'वेट अँड वॉच' करा."
तर रोहित पवार यांनी म्हटलं की, "काही कार्यकर्त्यांचे म्हणणे महाविकास आघाडीसोबत जाण्याचे आहे, तर काहींना घड्याळासोबत जायचे आहे. आम्ही कुटुंब म्हणून एकमेकांना भेटत असतोच, पण राजकीय रणनीती ठरवताना कार्यकर्त्यांच्या मताचा विचार करावा लागेल. यावर लवकरच मोठी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सर्व काही स्पष्ट करू."
(नक्की वाचा- समृद्धी महामार्ग आजपासून 3 दिवस टप्प्याटप्प्याने बंद राहणार; कुठे-कुठे आणि कधी असणार ब्लॉक?)
निवडणूक एकत्र लढणार की नाही यावर बोलताना रोहित पवारांनी म्हटलं की, यामध्ये कार्यकर्त्यांचं मत महत्वाचं आहे. हा निवडणुकीचा काळ नसता तर नेहमी जसं स्पष्ट बोलतो तस बोललो असतो. पण काही विचार न करता आताच्या काळात बोललो तर कार्यकर्त्यांच्या रणनीतीवर परिणाम होतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world