अविनाश पवार, प्रतिनिधी
Pune Nashik Rail : पुणे-नाशिक नवीन रेल्वे मार्गातील बदल, गेल्या आठ वर्षांतील या प्रकल्पाचा विलंबित कारभार आणि खेड-शिरूर भागातील विकासकामांकडे होत असलेले दुर्लक्ष या मुद्द्यांवरून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
"विमानतळ नाही, रेल्वे नाही, हायवेची अवस्था बिकट... शेवटी त्या भागातील जनता जायचे कुठे?" असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. आवश्यक असल्यास या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
'इतका वेळखाऊ मार्ग का?'
आढळराव पाटील यांनी 'NDTV मराठी' शी बोलताना सांगितले "पुणे-नाशिक रेल्वेचा ओरिजिनल मार्ग हा सर्वात सोयीचा होता, जो खेड-शिरूर भागासाठी अत्यंत महत्त्वाचा होता." परंतु, हा सोयीचा मार्ग कळत-नकळत बदलून शिर्डीला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला, ज्यावर त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला.
( नक्की वाचा : Pune Nashik Rail : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलला, जुन्नर-शिरूर पट्ट्यात नाराजीचा स्फोट! )
"दोन्ही बाजूंनी शिर्डी जोडता येते, तर मग नवा मार्ग इतका वेळखाऊ आणि अवास्तव कशासाठी?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. एका 26 मीटर रस्त्यासाठी एवढ्या मोठ्या रेल्वे मार्गात बदल करणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
'2019 नंतर फाईल हललीच नाही'
आढळराव पाटील यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रगतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, "2019 नंतर या प्रकल्पाची फाईल हललीच नाही. हा प्रकल्प पूर्णपणे राजकीय वादळात अडकला.
'' सुरुवातीला सुमारे 2,400 कोटी रुपयांचा हा प्रकल्प मंजूर झाला होता, ज्याचा खर्च राज्य आणि केंद्र सरकार समान प्रमाणात उचलणार होते. सुरुवातीला 300 कोटी रुपये भूसंपादन झाले, नंतर हा आकडा 900 कोटी रुपये झाला, पण त्यानंतर प्रकल्पाच्या प्रगतीत खंड पडला आणि पुढील कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही, असा दावा त्यांनी केला.
( नक्की वाचा : Latur-Mumbai : लातूरहून निघा अन् 5 तासात मुंबई गाठा! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; पाहा Exclusive Video )
चाकणच्या औद्योगिक पट्ट्याकडे दुर्लक्ष
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी चाकणसारख्या महत्त्वाच्या औद्योगिक पट्ट्याच्या विकासकामांकडे सरकार करत असलेल्या दुर्लक्षावर टीका केली आहे. पुणे जिल्हा देशातील सर्वाधिक वाहतूककोंडी असलेल्या जिल्ह्यांपैकी एक आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, चाकणसारख्या औद्योगिक भागाला हायवेची सुविधा नाही, रेल्वेचा मार्ग नाही आणि सरकार वारंवार या भागाकडे दुर्लक्ष करत आहे, ज्यामुळे येथील नागरिक आणि उद्योगांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
खेड विमानतळ वादावरील स्पष्टीकरण
खेड विमानतळ थांबण्यामागे त्यांचा सहभाग असल्याचे वारंवार होणारे आरोप आढळराव पाटील यांनी पुन्हा एकदा फेटाळले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, "खेड विमानतळ माझ्यामुळे थांबले, हा आरोप पूर्णपणे निराधार आहे. तांत्रिकदृष्ट्या त्या ठिकाणी विमानतळ उभारणे शक्य नव्हते आणि तिथे अनेक तांत्रिक अडचणी होत्या." त्यामुळे, "माझ्यामुळे विमानतळ गेले, ही गोष्ट चुकीची आहे," असे त्यांनी ठामपणे सांगितले.
विकासकामांच्या या दयनीय अवस्थेबद्दल त्यांनी सरकारला थेट विचारले, "विमानतळ नाही, रेल्वे नाही, हायवेची वाईट अवस्था... मग सरकार करते काय?" जनहितासाठी गरज भासल्यास आपण रस्त्यावर उतरू आणि लोकांसाठी हा लढा देऊ, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. "शिरूरचे खासदार काय करत आहेत हे मला सांगायची गरज नाही. 2019 नंतर फाईल हललीच नाही, ही वस्तुस्थिती आहे," अशा शब्दांत त्यांनी वर्तमान खासदारांच्या कार्यशैलीवरही टीका केली आहे.
पुणे-नाशिक रेल्वे मार्गाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचंही आढळराव पाटील यांनी सांगितलं.