जाहिरात

Pune Nashik Rail : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलला, जुन्नर-शिरूर पट्ट्यात नाराजीचा स्फोट!

Pune Nashik Rail : पुणे आणि नाशिक या महाराष्ट्रातील दोन प्रमुख वाढत्या शहरांना थेट जोडणाऱ्या बहुचर्चित सेमी हायस्पीड रेल्वे मार्गात बदल करण्यात आला आहे.

Pune Nashik Rail : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलला, जुन्नर-शिरूर पट्ट्यात नाराजीचा स्फोट!
Pune Nashik Rail : मूळ प्रस्तावित रेल्वेमार्ग हा पुणे–नाशिक महामार्गालगत जाणार होता.
पुणे:

अविनाश पाटील, प्रतिनिधी

Pune Nashik Rail : पुणे आणि नाशिक या महाराष्ट्रातील दोन प्रमुख वाढत्या शहरांना थेट जोडणाऱ्या बहुचर्चित सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या प्रस्तावित रूटमध्ये GMRT (Giant Metrewave Radio Telescope) प्रकल्पामुळे मोठा बदल करण्यात आला आहे. जुन्नर तालुक्यातील खोडद येथील या जागतिक महत्त्वाच्या वैज्ञानिक प्रकल्पामुळे, मूळ रेल्वेमार्ग रद्द करून नवीन पर्यायी मार्गाला केंद्र सरकारने प्राथमिक मंजुरी दिली आहे.

याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतेच लोकसभेत अधिकृत स्पष्टीकरण दिले. या निर्णयामुळे उत्तर पुणे जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसेल, अशी तीव्र नाराजी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

नवीन प्रस्तावित मार्ग आणि बदलाचे कारण

मूळ प्रस्तावित रेल्वेमार्ग हा पुणे–नाशिक महामार्गालगत जाणार होता. मात्र, खोडद येथील GMRT प्रकल्पाचे संवेदनशील क्षेत्र विचारात घेऊन केंद्राने हा मार्ग पूर्णपणे वगळला आहे.

रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन मार्गाची आखणी GMRT च्या संवेदनशील परिसराला वळसा घालून, तांत्रिकदृष्ट्या अधिक सुरक्षित मानल्या गेलेल्या मार्गावरून करण्यात आली आहे.

नवीन प्रस्तावित रूट: शिर्डी → अहमदनगर → शिक्रापूर → शिरूर → पुणे (शिर्डीमार्गे पुण्याकडे)

या बदलामुळे GMRT प्रकल्पाला कोणताही तांत्रिक धोका पोहोचणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. 

( नक्की वाचा : Pune News : एक बाई आणि 12 भानगडी! ॲसिड हल्ला ते पुरुषांशी जबरदस्तीनं जवळीक, 'या' बाईची संपूर्ण पुण्यात चर्चा )


शिरूरच्या खासदारांचा विरोध

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या बदललेल्या मार्गावर तीव्र नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारच्या निर्णयावर थेट टीका केली आहे. त्यांचा स्पष्ट आरोप आहे की, हा निर्णय  ‘उत्तर पुण्याचा विकास खुंटवणारा' आहे.

खासदार डॉ. कोल्हे यांचे प्रमुख आक्षेप

  • उत्तर पुणेचा विकास थांबेल: या रेल्वेमुळे उत्तर पुणे जिल्ह्याचा  सर्वांगीण विकास थांबेल.
  • शेती/कृषी क्षेत्राला नुकसान: मूळ मार्गामुळे शेती आणि कृषीपूरक उद्योगांना मोठा फायदा झाला असता, तो आता होणार नाही.
  • वाहतूक कोंडी: मंचर–शिरूर–आळंदी–राजगुरूनगर या पट्ट्यातील *वाहतूक कोंडी* सोडवण्यासाठी रेल्वेमार्ग उपयुक्त ठरला असता.
  • रोजगाराची संधी गेली: स्थानिकांना मोठ्या *गुंतवणुकीची आणि रोजगाराची* वाट उघडली असती, जी आता बंद झाली आहे.

डॉ. कोल्हे यांनी केंद्रावर टीका करताना म्हटले आहे की, "विकासाचा महामार्ग वळवून उत्तर पुण्याला अन्याय केला जात आहे."

‘जीएमआरटी' आमच्या मुळावर!

रेल्वे मार्गातील बदलाचे मूळ कारण असलेल्या जुन्नर तालुक्यातील खोडद गावातील ग्रामस्थांमध्ये GMRT प्रकल्पाविरोधात संतापाचा उद्रेक झाला आहे. जागतिक पातळीवर महत्त्वाचा असलेला हा रेडिओ दुर्बीण प्रकल्प संवेदनशील क्षेत्र असल्याने, या परिसरात मोठ्या बांधकामांवर, तसेच विद्युत आणि ध्वनी प्रदूषणावर *कठोर निर्बंध* आहेत. ग्रामस्थांनी केलेल्या 'चौपाल'मध्ये ही तीव्र भावना व्यक्त झाली.

( नक्की वाचा : Pune News : खराडी, हडपसर, स्वारगेट ते खडकवासला... पुण्यातील नवा भाग मेट्रोनं जोडणार, वाचा A to Z माहिती )

ग्रामस्थांचे प्रमुख आरोप

विकासावर निर्बंध: "GMRT आमच्या विकासाच्या मुळावर उठला आहे. घरात लाईटचे कनेक्शन घ्यायचे असेल तरी परवानगी लागते, व्यवसाय करायचा तर नवीन निर्बंध लावले जातात," अस आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 
रेल्वेमार्ग इथून गेला असता तर व्यापार वाढला असता आणि मुलांना रोजगार मिळाला असता, पण आता ती संधी गमावली.जगासाठी प्रकल्प मोठा असेल, पण गावासाठी तो कायमचा बोजाच ठरला आहे."

GMRTला विरोध होईल म्हणून गावाच्या विकासाच्या सर्व योजना मागे घेतल्या जातात आणि आता तर रेल्वेमार्गही गेला, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.

हा वाद स्थानिक विकासाचे स्वप्न विरुद्ध जागतिक वैज्ञानिक सुरक्षा या दोन टोकाच्या प्रश्नांना समोर आणत आहे.

रेल्वे मार्गाचे पुनर्मूल्यांकन  वैज्ञानिक सुरक्षा (Scientific Security) लक्षात घेऊन केले गेले आहे, हे निश्चितच योग्य आहे. GMRT प्रकल्पाचे जागतिक संशोधनातील योगदान महत्त्वाचे आहे. मात्र, त्याच वेळी या प्रकल्पाची वर्षानुवर्षे वाट पाहणाऱ्या उत्तर पुणे जिल्ह्यातील नागरिकांची रोजगाराची आशा आणि विकासाचे स्वप्न मोठ्या प्रमाणात धुळीस मिळाल्याची भावना 'NDTV मराठी' च्या ग्राऊंड रिपोर्टमध्ये स्पष्टपणे जाणवली. हा निर्णय वैज्ञानिकदृष्ट्या योग्य असला तरी, भावनिकदृष्ट्या तो कठीण आणि स्थानिक ग्रामस्थांसाठी निराशाजनक ठरला आहे, असाही दावा येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com