
Pandharpur Darshan : देहूतून तुकाराम महाराज पालखी आणि आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज पालखींचं प्रस्थान झालं असून आज दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी असणार आहे. 5 जुलै रोजी दोन्ही पालख्या पंढरपुरात दाखल होणार आहेत. दरम्यान प्रशासनाकडून चोख सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात आली आहे. पालखी मार्गावर काही अघटित घडू नये यासाठी ७ हजार पोलीस तैनात ठेवण्यात आले आहेत.
पालखी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी यंदा चार ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येणार आहे. यातून गर्दीवर नियंत्रण आणणं शक्य होईल. याशिवाय काही अघटित घडू नये यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा वापर केला जाणार आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी गेल्या चार दिवसांपासून सोलापूर ग्रामीण दलाची पाहणी करीत आहेत. याशिवाय दिंडीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत बॉम्बशोधक पथक, एसआरपीएफ पथके तैनात करण्यात येणार आहे. यंदा वारीसोबत जनरेटरही असणार आहे.
पंढरपूर मंदिराच्या बाहेर पडण्याचा मार्ग बदलला... (Pandharpur Darshan)
मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर भाविक नामदेव पायरी येथून घाटाकडे, व्हीआयपी गेट अशा विरुद्ध दिशेने पुन्हा मंदिरात येत असतात. त्यामुळे या भागात गर्दी होते. हे टाळण्यासाठी प्रशासनाकडून बॅरिकेट्स लावण्यात येणार असून भाविकांना मंदिराला वळसा घालून तुकाराम भवन, पश्चिम घाट मार्गाने बाहेर पडता येईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world