आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे दोन्ही पक्ष महापालिका निवडणुकीसाठी एकत्र लढणार असल्याची माहिती अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिली. मात्र, या युतीला शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विरोध दर्शवत राजीनामा दिल्याचे कळते आहे.
नक्की वाचा: महायुतीत दोस्तीत कुस्ती! पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या NCP ला शह देण्यासाठी भाजप-शिंदेंची सेना एकत्र
25 किंवा 26 डिसेंबरला आघाडीची अधिकृत घोषणा
सुभाष जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, दोन्ही गटांच्या वरिष्ठ नेत्यांची रात्री महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये सामंजस्याने आणि एकमेकांच्या मदतीने निवडणूक लढवण्यावर चर्चा झाली. यापुढची चर्चा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे आणि वंदना चव्हाण यांच्यासोबत होईल असे सुभाष जगताप यांनी सांगितले. जागावाटपाबाबत दोन्ही पक्ष दोन पावले मागे सरकण्यास तयार असून, 25 ते 26 डिसेंबरपर्यंत याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल. विशेष म्हणजे, चिन्हासंदर्भात दोन्ही पक्षांनी कोणताही ताठरपणा न दाखवण्याचे ठरवले आहे असे जगताप यांनी म्हटले.
नक्की वाचा: ‘ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है...!' भाजप नेत्यांचा अजित पवारांना इशारा, राजकीय वातावरण तापलं
जगताप विरूद्ध जगताप
यावेळी सुभाष जगताप यांनी प्रशांत जगताप यांच्या भूमिकेवर टीका केली. "प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिल्याचे मला समजतेय. एकेकाळी महापालिकेच्या सभेत 'माझी छाती फाडली तर अजितदादा दिसतील' असे म्हणणारे जगताप आता दादांच्या विरोधात कशी काय भूमिका घेऊ शकतात? हे त्यांच्या स्वार्थी राजकारणाचे लक्षण आहे," असे जगताप यांनी म्हटले. अजित पवारांनी त्यांना पहिल्याच टर्ममध्ये निवडून आले असतानाही महापौरपद दिले , तरी ते अशी भूमिका का घेत आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.