अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे:
Pune Purandar Airport News: पुण्यातील अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि बहुप्रतिक्षित प्रकल्प असलेल्या पुरंदर येथील प्रस्तावित 'छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळा'च्या कामाला आता वेग आला आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या एकूण जमिनीपैकी तब्बल ६० टक्क्यांहून अधिक भूसंपादन पूर्ण झाले आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेत आतापर्यंत १ हजार ८३७ एकर जागेचे संमतिपत्र (प्रतिज्ञापत्र) जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केले आहे. प्रशासकीय स्तरावर ही या प्रकल्पातील एक मोठी आणि सकारात्मक घडामोड मानली जात आहे.
पुरंदर विमानतळासाठी ६० टक्के भूसंपादन
या विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्याबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. जिल्हा प्रशासनाने योग्य समन्वय साधल्याने आतापर्यंत तब्बल ९०० कोटी रुपयांच्या भरघोस मोबदल्याचे वाटप थेट शेतकऱ्यांच्या पदरात पाडण्यात आले आहे. त्यामुळे सुरुवातीला असलेला स्थानिक पातळीवरील विरोध आता मावळताना दिसत असून, भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. मोबदला वाटपाची ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली जात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.
दरम्यान, अद्याप ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची संमतिपत्रे सादर केलेली नाहीत, त्यांच्यासाठी आता अत्यंत कमी वेळ शिल्लक राहिला आहे. जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, भूसंपादनासाठी संमतिपत्रे सादर करण्याची अंतिम मुदत अवघ्या दोन दिवसांत संपुष्टात येणार आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी या विहित मुदतीत आपली संमतिपत्रे जमा करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. या अंतिम दोन दिवसांनंतर प्रशासकीय स्तरावर पुढील कायदेशीर पावले उचलली जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आगामी काळात विमानतळाच्या प्रत्यक्ष उभारणीचा मार्ग अधिक सुकर होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world