
श्री संत सोपानकाका पालखी सोहळा निमित्ताने बारामती तालुक्यात 27 जूनपर्यत वाहतूक बदल करण्यात आले आहेत. या बाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश जारी केले आहेत. बारामती तालुक्यातील निरा-बारामती रोडवरुन होणारी वाहतूक 26 जून 2025 रोजी निरा कार्नर निंबुत वरुन मोरगाव रोडने चौधरवाडी फाट्यावरुन चौधरवाडीमार्गे करंजेपूल मार्गे वळवण्यात आली आहे. तसेच 27 जून रोजी निरा-बारामती रोडने होणारी वाहतूक ही कटींगपुल, बजरंगवाडी, को-हाळे खुर्द मार्गे होळ, वाणेवाडी, करंजेपूलमार्गे निरा यापर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे. तसेच आदेशात नमूद करण्यात आले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दरम्यान जगदगुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने दौंड तालुक्यातील वरवंडकरांचा पाहुणचार घेतला आहे. त्यानंतर बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडीकडे मुक्कामासाठी प्रस्थान केले. दिंडी सोहळ्याने पुणे सोलापूर महामार्गावरील प्रवास संपवला आहे. त्यानंतर नागमोडी वळणाच्या रोटी घाट टाळ मृदुंगाच्या साथीने हरिनामाच्या जयघोषात सहज पार केला आहे. हा घाट पार करण्यासाठी रोटी गावच्या सहा बैल जोड्यांनी परंपरेप्रमाणे पालखी रथाला साथ दिली.
तर दुसरीकडे संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा महर्षी वाल्मीक ऋषींच्या पवित्र वास्तव्याने पावन झालेल्या वाल्हे नगरीत विसावला आहे. सकाळी जेजुरी नगरीतील भाविकांचा निरोप घेत, हा पालखी सोहळा वाल्हेकडे मार्गस्थ झाला. टाळ-मृदंगाच्या गजरात, आणि 'विठ्ठल-विठ्ठल' च्या जयघोषात दुपारी साडेबारा वाजता पालखी वाल्हे गावात दाखल झाली. यानंतर येथे समाज आरती पार पडली.
वारी सोहळ्याच्या प्रवासात दुपारच्या वेळी होणारी ही एकमेव आरती असल्याने, या महाआरतीला भाविकांची मोठी गर्दी झाली होती. माऊलींचा आजचा मुक्काम वाल्हे येथेच होणार आहे. उद्या म्हणजेच गुरूवारी सकाळी माऊलींच्या पवित्र पादुकांना नीरा नदीत विधीपूर्वक स्नान घालण्यात येणार आहे. हा एक महत्वाचा क्षण असतो. याचे साक्षिदार लाखो भाविक उद्या होतील. पादुकांना नीरा नदीत स्नान घातल्यानंतर पालखी सोहळा पुढे जाईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world