Raigad Fort Pre-Wedding Shoot: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाचा साक्षीदार आणि स्वराज्याची पवित्र राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गडाच्या परिसरात प्री-वेडिंग व्हिडीओ शूट केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) खासदार सुनील तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे.
रायगडावर घडलेल्या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये संताप
ऐतिहासिक वारसास्थळ असलेल्या रायगडावर व्यावसायिक किंवा खासगी चित्रीकरणासाठी कडक नियम आहेत. असे असतानाही गडावरील महत्त्वाच्या ठिकाणी एका जोडप्याने प्री-वेडिंग शूट केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. गडाचे पावित्र्य जपण्याऐवजी तिथे अशा प्रकारचे वैयक्तिक सोहळे साजरे केल्याने गडाच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याची भावना व्यक्त होत आहे.
(नक्की वाचा: Nashik News: महिन्याला 90 लाख कमाई! त्र्यंबकेश्वर मंदिरात झटपट दर्शनाचा घोटाळा; विश्वस्तच निघाला मास्टरमाईंड)
खासदार सुनील तटकरे यांची आक्रमक भूमिका
खासदार सुनील तटकरे यांनी या घटनेवर संताप व्यक्त करताना म्हटले आहे की,"स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगड येथे प्री-वेडिंग व्हिडीओ शूट केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही अत्यंत निंदनीय बाब असून, या ऐतिहासिक वारशाचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी ही सर्व भारतीय नागरिकांची आहे. विशेषतः छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्मलेल्या आणि मोठे झालेल्या कुणाकडूनही अशा प्रकारची आगळीक होणे अपेक्षित नाही. यावर कठोर कारवाई केली जाईल. पुरातत्त्व खात्यालाही या संदर्भात सूचना देण्यात येतील. असे प्रकार यापुढे टाळावेत ही सर्व नागरिकांना विनंती आहे".
सुनील तटकरे यांनी दिलेल्या इशारामुळे आता काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world