NCP News: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुप्त संघर्ष सुरू असल्याच्या चर्चा आता समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या रात्रीच्या गुप्त भेटींमागे कोणते कारण होते, हे आता हळूहळू समोर येत आहे. पक्षांतर्गत वर्तुळातून लीक झालेल्या एका पत्रामुळे हे दोन्ही ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल प्रचंड नाराज झाले असून, याच नाराजीतून त्यांनी मुख्यमंत्र्यांचे दार ठोठावल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांना 13 जुलै 2026 रोजी लिहिलेले एक पत्र आता समोर आले आहे. या पत्रानंतरच तटकरे आणि पटेल यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.
खासदार पार्थ पवार यांना केंद्रात मंत्री करा अशी मागणी प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी थेट सुनेत्रा पवार याकडे केली. त्यानंतर तटकरे पटेल यांनी नाराजीतून मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहेत . या भेटीत पटेल-तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत यावर सविस्तर चर्चा केल्याचंही समजतंय. पार्थ पवार यांचं केंद्रात मंत्री होणे का गरजेचं आहे यासाठी आठ कारणे देखील पत्रात दिली आहेत.
(नक्की वाचा- LPG Cylinder: बुकिंगची कटकट संपणार, अवघ्या काही मिनिटात सिलेंडर मिळणार घरपोच; कुठे मिळेल ही सुविधा?)
पत्रात नेमके काय आहे?
येत्या काही दिवसांत देशात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर उदयकुमार आहेर यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे खासदार पार्थ पवार यांना थेट केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून घेण्याची आग्रही शिफारस केली आहे. आहेर यांनी सुनेत्रा पवारांचे कौतुक करताना, "अनेकांच्या कल्पनेप्रमाणे आपण 'गुंगी गुडिया' बनून राहिलेल्या नाहीत," असे म्हटले आहे.
पार्थ पवार यांना संधी देण्यासाठी 8 महत्त्वाची कारणे
- 21 व्या शतकातील व्हिजनरी नेतृत्व म्हणून पार्थ पवार हे तरुण व उमदे नेतृत्व आहेत.
- पार्थ पवार यांचे हिंदी आणि इंग्रजी भाषांवर त्यांचे विशेष प्रभुत्व असल्याने देशपातळीवर पक्षाचा विस्तार होईल.
- लंडनमध्ये उच्च शिक्षण झाल्यामुळे जागतिक आर्थिक, राजकीय घडामोडींचे पार्थ यांना पूर्ण आकलन आहे.
- देशभरातील तरुण वर्ग पक्षाकडे आकृष्ट होईल.
- भाजपसोबत मित्रपक्ष म्हणून राहूनही शिव, शाहू, फुले आणि आंबेडकरांचे विचार देशपातळीवर नेण्याची ताकद त्यांच्यात आहे.
- इतिहासातील छत्रपती संभाजी महाराजांचे उदाहरण देत, पार्थ पवारांना बदनाम करून त्यांचे करिअर संपवण्याचे कारस्थान स्वकीयांकडूनच सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
- 2019 मधील पराभवानंतर पार्थ पवारांचे खचलेले मनोधैर्य परत मिळवण्यासाठी त्यांना मोठी संधी देण्याचे अजित पवारांचे स्वप्न होते, ते आता पूर्ण करण्याची वेळ आली आहे.
- राजकारणापासून दूर गेलेल्या युवा वर्गाला ते पुन्हा मुख्य प्रवाहात आणू शकतात.
(नक्की वाचा- DMart Ready: डीमार्टची 7 शहरांतील सेवा बंद; स्वस्त वस्तू देऊनही स्पर्धेतील 'ही' रणनीती ठरली वरचढ)
पक्षातील एका प्रदेश उपाध्यक्षाने थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे अशा भाषेत पत्र लिहून ज्येष्ठ नेत्यांचा अवमान केल्यामुळे पटेल आणि तटकरे कमालीचे संतप्त झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याच संतापातून त्यांनी तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पार्थ पवार आणि त्यांच्या समर्थकांकडून ज्येष्ठ नेत्यांना कशा प्रकारे बाजूला केले जात आहे, याची तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world