- छत्रपती शिवाजी महाराजांच्या 353व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर लाखो शिवभक्त जमले आहेत
- रायगड पोलिसांनी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एक हजाराहून अधिक पोलिस कर्मचारी तैनात केलेत
- शिवराज्याभिषेक सोहळ्यात युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा होईल
मेहबुब जमादार
छत्रपती शिवाजी महाराजांचा 353 वा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर होत आहे. यासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने शिवभक्त गडावर दाखल झाले आहे. आदल्या रात्री अनेक जण रायगडावर होते. पण इथं राहाण्याची सोय नसल्याने अनेकांनीं तंबू ठोकून रायगडावर रात्र काढली. शिवाय यावेळी रायगड पोलीसांनी मोठ पोलीस बंदोबस्त तैनात केल्याची माहिती पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी दिला आहे. शुक्रवारी केवळ एका दिवसात 50 हजार पेक्षा जास्त शिवभक्त गडावर दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता ही त्यांनी वर्तवली आहे.
राज्याभिषेक सोहळ्या होणारी गर्दी पाहाता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रायगडच्या पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार 1198 पोलिस कर्मचारी, 150 पोलिस अधिकारी, 3 आरसीपी, 1 एस आर पी कंपनी टीम, ड्रोन कंट्रोल टीम यासह अन्य अधिकारी वर्ग शिवभक्तांच्या सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आला आहे. किल्ले रायगडावर पायी निघालेल्या शिवभक्तांना पायरी मार्गावर देखील पोलिस तैनात असणार आहेत. पार्किंग एरिया ते किल्ले रायगड अशी पोलिसांची विशेष टीम असणार आहे.
शिवराज्याभिषेक सोहळ्याला येणाऱ्या शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. काहींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे रथ तयार केले आहेत. ते रथ घेवून ते रायगडावर दाखल झाले आहेत. किल्ले रायगडावर शिवप्रेमीं कालपासून दाखल झालेत. मात्र रायगडावर राहाण्याची पुरेशी सोय नाही. तरही त्यांनी तंबू ठोकून शुक्रवारची रात्र रायगडावर काढली आहे. हा सोहळा अनुभवणे हे शिवभक्तांचे स्वप्न असते. त्यामुळेच देशभरातून हजारो शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल झाले आहेत. राज सदरेवरील मेघडंबरीला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. भगवे झेंडे, पताका , पोवाडे आणि शिवरायांचा जयजयकार यामुळे वातावरण शिवमय झालं आहे.

यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याची सुरूवात ध्वजवंदनाने होणार आहे. त्यानंतर शिवपालखी वाजत गाजत राजसदरेवर येईल. शिवराज्याभिषेकाचा मुख्य सोहळा सुरू होईल. उत्सव मूर्तीस अभिषेक झाल्यानंतर सिंहासनारूढ शिवपुतळ्याला सुवर्ण मुद्रांचा अभिषेक केला जाईल. युवराज संभाजीराजे छत्रपती महाराज यांच्या मार्गदर्शनानंतर राजसदर ते जगदीश्वर मंदिर अशी पालखी मिरवणूक निघेल.शिवसमाधीला अभिवादन करून सोहळ्याची सांगता होईल.
या शिव राज्याभिषेक सोहळ्या निमित्त होळीच्या माळावर मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यामध्ये तलवार बाजी, दांडपट्टा, लाठी काठी, अशा विविध प्रकारच्या मैदानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. ही प्रात्यक्षिके पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. स्वतः युवराज छत्रपती श्री संभाजी महाराज होळीच्या माळावरील मैदानावर उपस्थित राहत या प्रात्यक्षिकांचा आनंद घेतला. त्याचं कौतुक केलं. महत्वाचं म्हणजे तिथं ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी देखील प्रात्यक्षिके सादर करून आपलं नैपुण्य दाखवलं.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world