- स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधान परिषदेवर निवडून देण्याच्या कोकणातील जागेसाठी महायुतीत चढाओढ
- शिवसेना शिंदे गटाने कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघावर दावा केला आहे
- कोकण मतदार संघात शिवसेनाकडे सर्वाधिक 334 मतदार असून राष्ट्रवादी काँग्रेसकडे 165 आणि भाजपकडे 264 मतदार आहेत
स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधान परिषदेवर निवडून देण्याच्या 17 जागाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी महायुतीत अजून कोण कोणती जागा लढवणार यासाठी एकमत झालेले नाही. अजून चर्चा सुरू आहे. त्यात कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघावर शिवसेना शिंदे गटाने दावा केला आहे. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. सुनिल तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे हे या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत होते. ही जागा पुन्हा आपल्या पदरात पडवी यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न आहेत. पण शिवसेना नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी त्याला विरोध दर्शवला आहे.
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात शिवसेनेकडे सर्वाधिक मत आहे. 334 मतदार हे शिवसेनेचे आहेत. तर त्यानंतर भाजपचे 264 मतदार आहे. तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस असून त्यांच्याकडे 165 मतं आहेत. अशा वेळी ही जागा शिवसेनेला मिळाली पाहीजे अशी मागणी जोर धरत आहे. या जागेसाठी सुनिल तटकरे यांचे पुत्र अनिकेत इच्छुक आहेत. तर शिवसेनेकडून भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हे निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. भरत गोगावलेंच्या महाड येथील निवासस्थानी शिवसैनिकांची बैठक झाली. या बैठकीत विकास गोगावलेंनी ही निवडणूक लढवावी असा आग्रह करण्यात आला आहे. शिवाय तटकरेंना आमचा विरोध असल्याचं शिवसैनिकांनी आपलं मत मांडलं आहे.
सुनील तटकरे नेहमीच शिवसेनेला खोडा घालतात असा घणाघात शिवसैनिकांनी केला आहे. शिवसेनेकडे सर्वाधिक 334 मतं आहेत. त्यामुळे ज्याची मत जास्त त्याची जागा या नुसार कोकणची जागा शिवसेनेलाच मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे ही जागा आपण सोडणार नाही अशी भूमीका शिवसैनिकांची आहे. मात्र वरिष्ठ पातळीवर याबाबत अजून ही निर्णय झालेला नाही. त्यामुळे ही जागा कोणाच्या पारड्यात पडणार हे अजून निश्चित नाही. मात्र तटकरे या जागेसाठी आशावादी आहेत.
नक्की वाचा - Bakrid 2026: ना कुर्बानी ना नमाज! बकरी ईद देशभर साजरी होत असली तरी 'हे' शहर आहे अपवाद
काहींच्या मते रायगड जिल्हा पालकमंत्रीपदाच्या बदल्यात तटकरे ही जागा आपल्या पारड्यात पाडून घेवू शकतात. त्यासाठी ही शिवसेना तयार नाही. उलट या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली पाहीजे असा ही सुर निघत आहे. शिवसैनिक यासाठी अधिक आक्रमक आहेत. तसे झाल्यास कोकणात महायुती तुटण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे विकास गोगावले यांनी निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांना जिल्हा परिषदेनंतर आता आमदारकीचे वेध लागले आहेत. पण एकाच घरात दोन आमदार एकनाथ शिंदेंना मान्य होतील का हा खरा प्रश्न आहे. की कोणत्या कार्यकर्त्याला संधी दिली जाईल याकडे ही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world